नीर डोसा हा दक्षिण भारतातील, विशेषतः कर्नाटक राज्यातील एक अतिशय हलका, पातळ आणि चवीला सौम्य असा पारंपरिक पदार्थ आहे. या डोशाची खास ओळख म्हणजे तो खुसखुशीत नसून जाळीदार, मऊ आणि तोंडात विरघळणारा असतो. (Make Neer Dosa using only rice and coconut - the easiest dosa recipe and easy to to digest)नीर म्हणजे पाणी आणि या डोशाचे पीठही पातळसर असल्यामुळे त्याला नीर डोसा असे नाव पडले. नीर डोसा प्रामुख्याने तांदूळाचा केला जातो. यात उडीद डाळ किंवा आंबवण्यासाठी काही घातले जात नाही. जास्त पदार्थ न वापरता अगदी साध्या पद्धतीने हा डोसा केला जातो, त्यामुळे तो पचायला हलका असतो. इतर डोश्यांप्रमाणे तो आंबट नसतो. पचायला अगदी हलका असल्याने नाश्त्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे.
साहित्य
इडली तांदूळ, पाणी, मीठ, तेल, नारळ
कृती
१. इडलीसाठी खास जो तांदूळ मिळतो तो घ्यायचा. तीन ते चार पाण्यातून स्वच्छ धुवायचा. नंतर त्यात साधे पाणी ओतायचे आणि किमान ६ तासांसाठी भिजत ठेवायचे. नंतर त्याचे पाणी काढून टाकायचे. एका मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घ्यायचे. त्यात सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे. चार ते पाच चमचे पाणी घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. मिश्रण वाटून घ्यायचे. छान एकजीव वाटायचे.
२. एका खोलगट भांड्यात मिश्रण काढून घ्यायचे. त्यात थोडे पाणी घालायचे आणि थोडावेळ बाजूला ठेवायचे. छान फेटायचे. मिश्रण पातळ करायचे. तव्याला तेल लावायचे. जरा तवा तापला की मिश्रण ओतायचे. जरा वरतून ओता म्हणजे छान पसरते.
३. डोसा तवा सोडायला लागला की काढून घ्यायचा, उलथून परतायचा नाही, एकाच बाजूनी परतायचा. छान मऊ आणि पातळ होतो. आवडत्या चटणीसोबत खा.
