आवळ्याचा सिझन आल्यावर घरोघरी केला जाणारा एक खास पदार्थ म्हणजे मोरावळा. मोरावळा हा आवळ्याचा सर्वात स्वादिष्ट आणि लोकप्रिय गोड प्रकार मानला जातो. त्याचा सुगंध, हलकी आंबट-गोड चव आणि रसाळ पोत यामुळे तो तोंडात अगदी विरघळल्यासारखा वाटतो. (Make Moravala with jaggery in 10 minutes, a must-try dish during the winter season)हिवाळ्यात मोरावळा खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि थकवा दूर होतो. त्यातील पौष्टिक गुणधर्म त्वचा, केस आणि पचनासाठीही फायदेशीर ठरतात. सकाळी एक चमचा मोरावळा खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे पोषण, चव आणि आरोग्य यांचा सुंदर संगम असलेला मोरावळा हा सर्व वयोगटातील लोकांच्या आवडीचा पदार्थ ठरतो. करायला अगदी सोपा आहे. साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर जास्त पौष्टिक ठरतो. पाहा कसा करायचा. जाणून घ्या एकदम सोपी रेसिपी.
साहित्य
आवळा, पाणी, वेलची, गूळ, लवंग, तूप
कृती
१. छान ताजे आवळे घ्यायचे. गूळ किसून घ्यायचा. एका इडलीपात्रात किंवा कोणत्याही खोलगट भांड्यात पाणी घ्यायचे. त्यावर ताटली ठेवायची. पाणी गरम करायचे आणि ताटलीत आवळे ठेवायचे. झाकण ठेवायचे, आवळे वाफवून घ्यायचे. सुरी किंवा चमच्याने आवळा दाबून पाहायचा. मऊ झाला असेल तर व्यवस्थित शिजलेला आहे. रंग जरा फिका होतो.
२. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. त्यावर किसलेला गूळ घालायचा. गूळ जरा छान परतायचा. आवळ्याला सुरीने गोल पाडायचे. किंवा चिर द्यायची. मग आवळा गुळाच्या पाकात घालायचा, ढवळायचे आणि त्यात लवंग घालायची. वेलची घालायची. झाकण ठेवायचे आणि वाफ काढायची.
३. आवळा गार झाला की जरा घट्ट होतो. अगदी सोपी रेसिपी आहे आणि टिकतेही बरेच दिवस. तसेच गार झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे. आवडत असेल तर त्यात मसालेही घालू शकता. गुळाऐवजी साखरही वापरु शकता.
