Join us

Shravan Special : २ चमचे तुपात करा महिनाभर टिकणारे उपासाचे लाडू; पचायला हलके आणि करायलाही सोपे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:22 IST

Shravan Special Recipe: श्रावणात या ना त्या कारणाने अनेकांचे उपास असतात, अशा वेळी पोटाला आधार आणि पचायला हलके, पौष्टिक लाडू करा आणि महिनाभर स्टोअर करा. 

श्रावण(Shravan 2025) हा सण उत्सवाचा, व्रत वैकल्याचा. या निमित्ताने महिनाभर सात्विक आहार घेतला जातो, तसेच सण वारी उपास केले जातात. मंगळागौर, सत्यनारायण पूजा होईपर्यंत अर्धवेळ उपास होतो, अशा वेळी ऍसिडिटीचा त्रास होऊ नये आणि उपासाचे पदार्थ(Shravan Vrat Recipe 2025) खाऊन पोटही जड होऊ नये, यासाठी करायला सोपी आणि पचायला हलकी अशा लाडवांची रेसेपी जाणून घेऊ. यात साबुदाण्याची वापर केलेला नाही. एक लाडू खाल्ला तरी पोटाला आधार मिळेल आणि उपास करून डोळ्यात प्राण येणार नाहीत. चला तर पाहूया रेसेपी -

उपासाचे लाडू रेसेपी :

साहित्य : 

अर्धा वाटी वरी तांदूळ, पाव वाटी राजगिरा, पाव वाटी शेंगदाणे, अर्धा कप दूध, अर्धा वाटी गूळ, वेलची, दोन चमचे तूप

कृती : 

>> सर्वप्रथम मिक्सरमध्ये वरी तांदूळ, राजगिरा, शेंगदाणे एकत्र बारीक वाटून घ्या आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. 

>> रूम टेम्परेचरला आलेले अर्धा कप दूध घालून मिश्रण भिजवून घ्या. 

>> त्याच्या पुरीच्या आकाराच्या जाडसर पोळ्या लाटून घ्या. 

>> त्यांना दोन्ही बाजूने तूप लावून छान शेकून घ्या. 

>> शेकलेल्या पोळ्या गार झाल्या की त्याचे तुकडे दोन ते चार वेळा मिक्सरमध्ये बारीक भरडून घ्या. 

>> त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी गूळ, वेलची घालून पुन्हा एकदा मिश्रण फिरवून घ्या. 

>> तयार झालेल्या मिश्रणाचे दाणेदार लाडू वळून घ्या. 

>> हे लाडू महिनाभर टिकतात आणि साबुदाणा नसल्यामुळे हे खाल्ल्याने पित्ताचा त्रासही होत नाही. 

पहा 'पल्लवी मराठी किचन' यांचा व्हिडीओ -

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थश्रावण स्पेशलअन्नआरोग्यभारतीय उत्सव-सण