हिवाळ्यात मटार हा पदार्थ छान ताजा मिळतो. त्यामुळे विविध मटारचे पदार्थ करायला काहीच हरकत नाही. त्यात मग मटार पराठा आणि मटार कचोरी आलीच. पण कधी मटारचे नगेट्स खाल्ले आहेत का ? सोप्या भाषेत रवा घालून केलेली मटारची भजी. (Make fresh peas nuggets at home, must try this hot food in winter - kids will love it)करायला अगदी सोपी असते. हिवाळ्यात गरमागरम नगेट्स नक्की करा. सगळेच आवडीने खातील. चहासोबत खाण्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे.
साहित्य
मटार, बटाटा, पाणी, रवा, जिरे, चिलीफ्लेक्स, तेल, हिरवी मिरची, मॅगी मसाला, लसूण, तांदूळ पीठ, धणे - जिरे पूड
कृती
१. छान ताजे मटार सोलून घ्यायचे. बटाटा उकडून घ्यायचा. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. एका मिक्सरच्या भांड्यात मटार, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. वाटून घ्या. जास्त लगदा करु नका, जाडसरच वाटायचे.
२. वाटून झाल्यावर एका कढईत तेल घ्यायचे. तेलात चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान परतून झाल्यावर त्यात तयार केलेली मटारची पेस्ट घालायची. परतून घ्यायची. तसेच थोडे चिलीफ्लेक्स घालायचे. छान परतून घ्या. एक वाफ काढून घ्यायची. चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. त्यात पाणी ओतायचे. जरा पातळ करायचे. चवीपुरते मीठ घालायचे, उकळायचे आणि मग रवा घालायचा. रवा छान शिजू द्यायचा. घट्ट असे पीठ तयार होते. जास्त घट्ट नाही. जरा सैलसर.
३. ते पीठ गार करुन घ्यायचे. त्यात एक किंवा दोन उकडलेले बटाटे किसून घालायचे. चमचाभर तांदूळाचे पीठ घालायचे आणि पीठ मळून घ्यायचे. पीठ मळल्यावर त्याला नगेट्सचा आकार द्यायचा. त्यासाठी पीठ लाव असे तयार करुन त्याचे तुकडे पाडायचे. जसे पापड करताना करता अगदी तसेच. नंतर सुरीच्या मदतीने लहान तुकडे पाडून घ्या.
४. कढईत तेल गरम करायचे. त्यात तयार केलेले नगेट्स तळून घ्यायचे. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे. कुरकुरीत आणि खमंग होतात.
