आवळ्याचा मुखवास हा केवळ तोंडाची दुर्गंधी दूर करणारा नसून आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत गुणकारी आहे. जेवणानंतर थोडासा आवळ्याचा मुखवास खाल्ल्याने पचनसंस्था, तोंडाचे आरोग्य आणि एकंदर शरीरावर चांगला परिणाम होतो. पारंपरिक पद्धतीने तयार केलेला आवळ्याचा मुखवास औषधी गुणांनी भरलेला असतो.(Make a great mukhwas at home - it not only removes bad breath but also provides many health benefits) आवळ्यामध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मुखवासाच्या स्वरुपात आवळा घेतल्याने हे पोषण सहजपणे शरीराला मिळते. जेवणानंतर पचनक्रिया मंदावते, अशावेळी आवळ्याचा मुखवास पचन रसांची निर्मिती वाढवतो आणि अन्न नीट पचण्यास मदत करतो. त्यामुळे जडपणा, पोटफुगी आणि अपचनाचा त्रास कमी होतो. तसेच त्यात बीट असेल तर त्याचा फायदा जास्त होतो. पाहा हा गुलाबीसर मुखवास करण्याची रेसिपी.
साहित्य
आवळा, बीट, साखर, जिरे, आलं, ओवा, मीठ, काळं मीठ, बडीशेप
कृती
१. मस्त ताजा असा आवळा किसून घ्यायचा. तसेच बीट सोलायचे आणि मग किसून घ्यायचे. बडीशेप छान भाजून घ्यायची. तसेच ओवाही जरा भाजायचा. आवळा आणि बीटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या.
२. किसलेला आवळा तसेच बीट एकत्र करा. त्याला चवीपुरते मीठ लावायचे. मिक्स करायचे आणि जरा बाजूला ठेवायचे. जास्त पाणी निघेल ते काढून टाका. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेली बडीशेप घ्यायची. तसेच त्यात भाजलेले जिरेही घालायचे. दोन चमचे साखर घालायची. थोडा ओवा घालायचा. अगदी किंचित वाटून घ्यायचे. बटण एकदा फिरवून हलकी पूड करायची. जास्त नाही जाडसरच ठेवायचे.
३. तयार केलेला मसाला मिश्रणात ओतायचा. किसलेले आले घालायचे. मस्त मिक्स करायचे आणि नंतर एका पसरट परातीत किंवा ताटलीत मिश्रण पसरवून लावायचे. मोकळे ठेवायचे. पातळ थर लावायचा. दोन ते तीन दिवस उन्हात वाळवायचे. वाळवून झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे. छान चविष्ट असा मुखवास होतो.
