गरमागरम वरण भातासोबत खाण्यासाठी सुरणाचे काप एकदा नक्कीच करा. हा पारंपरिक पदार्थ करणं तसं अवघड नाही पण काळजीपूर्वक करायला हवा. सुरणाचे काप करताना जर काही चुका केल्या तर मात्र खाल्ल्यावर त्रास होऊच शकतो. म्हणून काळजी घ्यायला हवी.
सुरणाचे काप कसे करतात?
सुरण, पाणी, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे पूड, लिंबू, आलं, लसूण, रवा, तांदळाचे पीठ, तेल, चिंच
१. सुरण त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात चिरायचे. साल नीट काढून घ्यायचे. पाण्यात मीठ घालायचे आणि त्या पाण्यात एकदम व्यवस्थित चोळून धुवायचे. मग पाणी काढून टाकायचे. नंतर एका खोलगट पातेल्यात पाणी घ्यायचे. त्यात चमचाभर मीठ घालायचे आणि चिंचेचा तुकडा घालायचा. गॅसवर ठेवायचे आणि शिजवून घ्यायचे. कुकरमध्येही उकडवून घेता येतात. मात्र चिंच घालायचा विसरायचे नाही. सुरण खाऊन घशात खवखवल्यासारखे होते त्यामुळे चिंच घालणे गरजेचे आहे.
२. एका खोलगट ताटलीत मीठ, लाल तिखट, हळद, जिरे पूड घ्या. आलं लसूण वाटून हे सारं कालवून घ्या. थोडा लिंबाचा रस घालायचा. आता हे सारं नंतर सुरणाच्या कापांना छान लेप लावल्यासारखं लावून घ्यायचं.
३.सुरण शिजल्यावर पाणी काढून टाकायचे. सुरण अति शिजवायचे नाही. जरा अगदी किंचित कच्चे ठेवायचे. म्हणजे छान कुरकुरीत होते. तयार केलेल्या मसाल्यात सुरण घालून सगळा मसाला छान लावायचा. थोडावेळ मुरु द्यायचे.
४. एका खोलगट ताटलीत रवा घ्यायचा त्यात तांदळाचे पीठ घालायचे आणि मीठ घालायचे. तसेच चमचाभर हळदही घालायची. सगळं एकजीव करायचं आणि मग सुरणाचे मसाला लावलेले काप त्यात व्यवस्थित आलटून पालटून फिरवायचे. सगळीकडे रवा नीट लावायचा.
५. पॅनमध्ये थोडे तेल घालायचे.. त्यावर तयार काप ठेवायचे. झाकून एक वाफ काढायची मग कुरकुरीत होईपर्यंत छान तेलावर भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत झाल्यावर गरमागरम सुरणाचे काप चवीला छान लागतात.