महाराष्ट्रात केले जाणारे उडदाचे डांगर नक्की करुन पाहा. कमी सामग्रीत मस्त खमंग पदार्थ करता येतात. (Maharashtra food: Urad dal is mouth-watering! Traditional nutritious and simple recipe)त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे डांगर. एकदा असे उडदाचे डांगर नक्की करा.
साहित्य
काळे उडीद/अख्खे उडीद , कोथिंबीर, कांदा, लाल तिखट, लसूण, पाणी, हळद, मीठ, तेल
कृती
१. अत्यंत साधी आणि सोपी रेसिपी आहे. फार कष्ट नाहीत. काळे उडीद घ्यायचे. कढईत तापवायची आणि त्यात काळे उडीद भाजायचे. तेल पाणी काही न वापरता भाजून घ्यायचे. किमान २५ मिनिटे ते अर्धा तास भाजायला लागतो. सतत ढवळायचे. छान भाजून घ्यायचे. गॅस कमी ठेवायचा. मोठा ठेवायचा नाही. मंद आचेवर छान परतून घेतल्यावर गार करत ठेवायचे. ताटात पसरुन ठेवा म्हणजे पटकन सुकतात.
२. कांदा सोलायचा आणि मस्त बारीक चिरायचा. कोथिंबीरीची ताजी जुडी आणा. निवडून घ्या आणि बारीक चिरुन घ्या. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या. बारीक चिरायच्या. मिक्सरमधून वाटल्या तरी चालेल. उडीद गार झाल्यावर त्याची पूड तयार करायची.
३. मिक्सरच्या भांड्यात उडीद घ्यायचे आणि सरसरीत वाटायचे. त्याचे मस्त मोकळे पीठ तयार करायचे. तयार पीठ चाळून घ्यायचे. त्यातील अख्खे दाणे आणि जाडसर भाग काढून टाकायचा आणि चाळलेले पीठ खोलगट वाडग्यात किंवा परातीत घ्यायचे. त्यात चिरलेला कांदा घालायचा. तसेच लसणाचे तुकडे घालायचे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची. तसेच लाल तिखट आवडीनुसार घाला आणि चमचाभर हळद घाला. चवी पुरते मीठ घाला आणि ढवळून घ्या. थोडे दोन ते चार चमचे तेल गरम करा आणि गरमागरम तेल पीठात ओता. तेल घातल्यावर पीठ मस्त मिक्स करा.
४. हळूहळू पाणी घालून पीठ कालवून घ्यायचे. जास्त घट्ट नका करु. जरा सैलसरच पीठ तयार करायचे. त्याचा ओलसर गोळा वळता येईल असे पीठ मळून झाल्यावर त्याचा गोळा वळायचा आणि वरती बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची. काही जण तुपाची धारही सोडतात. भाकरीशी किंवा गरमागरम भाताशी उडदाचे डांगर खाल्ले जाते. चवीला एकदम मस्त लागते. उडीद भाजण्याचे काय ते कष्ट बाकी एकदम झटपट रेसिपी आहे.