Lunchbox Ideas and Recipes: आज कोणती भाजी, या प्रश्नावर दुधी असे उत्तर येताच घरचे नाक मुरडतात. वास्तविक पाहता बिचाऱ्या दूधीला स्वतःची चव नाही, तरी कांदा, टोमॅटो, चणा डाळ अशा कोणत्याही घटकाबरोबर जुळवून घेते. त्यात दाण्याचं कूट आलं की भाजीची चवही वधारते. तरीसुद्धा ती खाण्याची कोणाचीही तयारी नसते. अशा वेळी गृहिणींना काळजी वाटते, सकस आहार द्यावा तरी कसा? त्यावर उपाय म्हणून त्या वेगवेगळे पर्याय शोधून काढतात. दुधीची भाजी पोटात जाण्याचा असाच एक पर्याय म्हणजे दुधीचे पराठे!
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
साहित्य :
एक मोठी किसलेली दुधी, दोन वाट्या गव्हाचं पीठ, आल्याचा छोटा तुकडा, दोन मिरच्यांचे बारीक काप, कोथिंबीर, आमचूर पावडर, तिखट पावडर, धने जिरे पावडर, हळद, गरम मसाला, ओवा, कसुरी मेथी, मीठ, तेल आणि पराठ्यांवर लावण्यासाठी तूप
कृती :
>> सर्वप्रथम दुधी किसून घ्या आणि किसलेली दुधी एका परातीत घ्या.
>> त्यात कणीक, मसाले, कोथिंबीर, कसुरी मेथी, दोन चमचे तेल आणि ओवा तळहातावर चोळून घाला.
>> पराठ्याची कणिक बांधण्यासाठी पाणी अजिबात वापरू नका. दुधीत मीठ आणि इतर मसाले पडल्यामुळे आपोआप पाणी सुटते आणि त्यात कणिक व्यवस्थित भिजते.
>> कणिक थोडी ओलसर भिजल्यासारखी वाटत असेल तर त्यावर थोडे पीठ टाकून घ्या.
>> कणिक मुरण्यासाठी न ठेवता लगेच त्याचे एकसमान गोळे करून घ्या.
>> गव्हाचे पीठ लावून पराठा लाटून घ्या. वाटल्यास सगळे पराठे एकाच वेळी लाटून घ्या, म्हणजे शेकताना ते सोपे जातील.
>> तवा तापल्यावर आच मध्यम ठेवून पराठा तूप लावून शेकून घ्या.
>> हे पराठे दही, कोशिंबीर, लोणचं, चटणी, ठेचा कशाबरोबरही खाऊ शकता.
>> दुधीचे हे पराठे घरच्यांना आवडतील आणि तुम्हालाही दुधीसारखी पौष्टिक भाजी खाऊ घातल्याचे समाधान मिळेल.
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम!