मुळ्याचा पाला म्हणजेच मुळ्याची भाजी फार आवडीने खाल्ली जात नाही. हा पाला बहुतेक वेळा दुर्लक्षित केला जातो, पण प्रत्यक्षात तो मुळ्यासारखाच पौष्टिक मानला जातो. पोषणशास्त्रानुसार मुळ्याचा पाला आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.(Is it true or false that eating radish leaves causes stomach upset? If you want to stay healthy read this ) नियमित आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास तो अनेक तक्रारींवर नैसर्गिक उपाय ठरतो.
मुळ्याच्या पाल्यात लोह (Iron) चांगल्या प्रमाणात असल्यामुळे तो रक्तवाढीसाठी उपयुक्त ठरतो. अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा समस्या असलेल्या लोकांसाठी हा पाला लाभदायक आहे. विशेषतः महिलांसाठी आणि वाढत्या वयातील मुलांसाठी मुळ्याचा पाला आहारात असणे फायदेशीर ठरते. या पाल्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, गॅस यांसारखे त्रास कमी होतात. मुळ्याचा पाला आतड्यांना स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि पोट हलके राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही तो उपयोगी ठरतो.
मुळ्याचा पाला व्हिटॅमिन ए, सी आणि के ने समृद्ध असतो. व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, सर्दी-खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य सुधारते, तर व्हिटॅमिन के हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
हा पाला यकृत (लिव्हर) स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोगी मानला जातो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते. पित्त वाढले असल्यास योग्य प्रमाणात घेतलेला मुळ्याचा पाला पित्त संतुलित ठेवण्यासही मदत करतो.
मुळ्याच्या पाल्यातील अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करतात. त्यामुळे सांधेदुखी, सूज, अंगदुखी यांसारख्या तक्रारींमध्ये आराम मिळतो. तसेच हा पाला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो, कारण त्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते.
त्वचेसाठीही मुळ्याचा पाला फायदेशीर आहे. शरीर आतून स्वच्छ झाल्यामुळे मुरुम, पुरळ, त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. केस गळणे कमी होऊन केसांना पोषण मिळते, कारण यामध्ये आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे असतात. त्यामुळे मुळ्याची भाजी आहारात असायलाच हवी. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. तसेच तिची कोशिंबीरही करता येते. त्यामुळे हा पाला आहारात नक्की घ्या.
