वाल किंवा पावटा खाल्ल्याने पोट बिघडते असा समज अनेक जणांचा असतो. पण प्रत्यक्षात हा पदार्थ वाईट नसून, तो कोणाला, किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने खाल्ला तर त्रास होत नाही याचे प्रमाण ठरलेले असते. (Is bean pod really bad for stomach? see who can eat and who should avoid it )पावटा खाल्याने अनेकांच्या पोटात गॅसेस होतात, पण पावटा पोट साफही करतो. तुम्ही तो किती आणि कसा खाता परिणाम यावर अवलंबून असतो. वाल - पावटा ही कडधान्ये असल्यामुळे पोषणमूल्यांनी समृद्ध असतात, मात्र काही लोकांना ते पचायला फार जड जाऊ शकतात.
वालामध्ये भरपूर प्रथिने, तंतू (फायबर), लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि बी–कॉम्प्लेक्स जीवनसत्वे असतात. त्यामुळे शरीराला ताकद मिळते, स्नायू मजबूत राहतात आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. वालातील तंतूंमुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि दीर्घकाळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही तो उपयोगी ठरतो. ग्रामीण भागात श्रम करणाऱ्या लोकांच्या आहारात वालाचा समावेश असण्याचे हेच कारण आहे.
तरीही काही लोकांना वाल किंवा पावटा खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस होणे, जडपणा वाटणे किंवा जुलाब होणे असा त्रास जाणवतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे हे कडधान्य पचायला थोडं जड असतं. विशेषतः वाल नीट भिजवला नसेल, योग्य प्रकारे शिजवला नसेल किंवा जास्त प्रमाणात खाल्ला असेल तर पचनसंस्थेवर ताण येतो. काही जणांची पचनशक्ती मुळातच कमजोर असते, त्यांना असे पदार्थ लवकर बाधतात. वाल योग्य पद्धतीने खाल्ला तर पोट बिघडण्याची शक्यता खूपच कमी होते. वाल किंवा पावटा शिजवण्याआधी किमान ८–१० तास भिजवणे, पाणी बदलून नीट उकडणे आणि त्यात हिंग, जिरे, आलं, लसूण यांसारखे पचनास मदत करणारे पदार्थ घालणे फायदेशीर ठरते. अगदी रोज न खाता आठवड्यातून एकदा आणि मर्यादित प्रमाणात खाल्ला तर तो शरीरासाठी त्रासदायक ठरत नाही.
कोणी वाल किंवा पावटा खाणे टाळावे हे ही महत्त्वाचे आहे. ज्यांना सतत गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा जुलाबाचा त्रास होतो, त्यांनी हा पदार्थ कमी प्रमाणात खाणे किंवा टाळलेला बरा. पचनसंस्था खूपच कमकुवत असलेल्यांनी, आजारी व्यक्ती किंवा ऑपरेशननंतरचे रुग्ण यांनाही वाल सहज पचेलच असे नाही. काहींना कडधान्यांमुळे अॅलर्जी किंवा अपचन होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. वालाचा त्रास पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जास्त होतो.
एकूणच पाहता, वाल किंवा पावटा हा आरोग्यासाठी वाईट नाही, उलट तो पोषणमूल्यांनी भरलेला चांगला पदार्थ आहे. मात्र प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते. त्यामुळे वाल खाल्ल्याने पोट बिघडतं असा सरसकट निष्कर्ष न काढता, स्वतःच्या शरीराला काय मानवतं याकडे लक्ष देणे जास्त योग्य ठरते. योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास वाल हा नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
