सध्या सगळीकडे धुरंधर या चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. धुरंधर सिनेमात एक सीन आहे, हमझा आणि आलम चहा प्यायला जातात, आलम त्याला सांगतो की मला मीठ घातलेला चहा आवडतो. हमझाला म्हणतो पिऊन बघ, पण एवढा धुरंधर हमझा त्याला मीठाचा चहा पिऊन ठसकाच लागतो. तो सिन पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की मीठ घातलेला चहा कोण पितं? दुधाचा चहा नी त्यात मिठाचा खडा? कशाला? चाय में नमक ये मामला आखीर है क्या?(In the movie Dhurandhar, Hamza and Alam drink namkeen Chai, do people really put salt in tea? )
ऐकून आश्चर्य वाटेल की भारतात आणि इतर काही ठिकाणी असा मीठ घातलेला दुधाचा चहा प्यायला जातो. लोकं तो आवडीने पितात. ऐकायला जरा वेगळे वाटले तरी हा चहा अनेकांच्या दिनचर्येचा भाग आहे.
मीठ घातलेला चहा प्रामुख्याने तिबेट, लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, नेपाळ आणि मंगोलिया यांसारख्या थंड व डोंगराळ भागांमध्ये प्यायला जातो. तिबेट आणि लडाखमध्ये हा चहा बटर टी किंवा पो-चा या नावाने ओळखला जातो. काळा चहा, मीठ आणि याकच्या दुधाचे लोणी घालून तयार होणारा हा चहा अतिथंड हवामानात शरीराला उब देतो, ऊर्जा टिकवतो आणि दीर्घकाळ ताकद राखण्यास मदत करतो. उंच पर्वतीय भागात जिथे ऑक्सिजन कमी असतो, तिथे असा चहा शरीरासाठी उपयुक्त मानला जातो.
काश्मीरमध्ये प्रसिद्ध असलेला नून चाय किंवा शीर चाय हाही मीठ घातलेला चहा आहे. गुलाबी रंगाचा हा चहा दूध आणि मीठ घालून तयार केला जातो. काश्मिरी संस्कृतीत या चहाला विशेष महत्त्व असून लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि थंडीच्या दिवसांत हा चहा आवर्जून दिला जातो. चवीला सौम्य आणि किंचित खारट असलेला हा चहा पचनासाठी चांगला मानला जातो.
हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या काही डोंगराळ भागांतही मीठ घातलेला चहा प्रचलित आहे. कठीण हवामान, जास्त शारीरिक श्रम आणि थंडीमुळे शरीराला आवश्यक असलेली उष्णता आणि क्षार मिळवण्यासाठी अशा चहाचा उपयोग होतो. मंगोलियामध्येही दूध आणि मीठ घालून तयार होणारा चहा दैनंदिन आहाराचा भाग आहे, जो भटक्या जीवनशैलीत ऊर्जा देणारा मानला जातो. मीठाचा चहा करण्यासाठी वेगळी खास अशी चहा पूडही वापरली जाते. मात्र आपल्या रोजच्या वापरातील साधी चहा पूडही चालते.
कृती
१. पातेल्यात पाणी उकळवायचे. त्यात थोडे आले घालायचे आणि मग साखरही घालायची. चहा पूड घालून उकळायचे. थोडे दूध घालायचे आणि उकळायचे. शेवटी थोडे मीठ घालायचे. अगदी थोडे मीठ घालायचे, जास्त नाही. चहा उकळायचा आणि गरमागरम प्यायचा. गार होत जातो तसा खारट होतो.
