नेहमी नेहमी तेच ते खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. सणासुधीला पनीरच्या रेसिपीज बऱ्याच केल्या जातात. पण हॉटेलमध्ये करतात तशी शाही पनीरची भाजी घरात होत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. हॉटेलमध्ये मिळतात तसे मखमली आणि चविष्ट शाही पनीर घरी करण्यासाठी ८ टिप्स खूपच महत्वाच्या आहेत. (How To Make hotel style Shahi Paneer at home)
१) हॉटेलमधले पनीर खूपच मऊ लागते. यासाठी पनीरचे तुकडे कापल्यानंतर ते कोमट मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटं ठेवा. यामुळे पनीर कडक न होता अगदी कापसारखे मऊ राहते.
२) शाही पनीरची ग्रेव्ही सिल्की स्मूथ असणं गरजेचं आहे. कांदा, टोमॅटो आणि काजूची पेस्ट वाटून झाल्यानंतर ती गाळणीनं गाळून घ्या. यामुळे ग्रेव्हीमधील मसाल्यांचा जाड कण निघून जातात आणि हॉटेलसारखा मखमली पोत येतो.
३) केवळ कांदा-टोमॅटोने चव येत नाही. ग्रेव्हीमध्ये रिचनेस आणण्यासाठी काजू आणि मगज बिया गरम पाण्यात भिजवून त्याची बारीक पेस्ट वापरा. यामुळे ग्रेव्हीला नैसर्गिक गोडवा आणि दाटपणा येतो.
४) शाही पनीरमध्ये तिखटाचा मारा करू नका. यात कश्मिरी लाल तिखट वापरा. ज्यामुळे रंग छान येते पण चव जास्त तिखट लागत नाही तसंच शक्य असल्यास पांढरी मिरी पूड वापरा.
५) ग्रेव्ही शिजवताना त्यात फेटलेलं ताजं दही घाला आणि शेवटी फ्रेश क्रिम घाला. दही घालताना गॅसची फ्लेम मंद ठेवा. अन्यथा दही फाटू शकते. यामुळे ग्रेव्हीला एक विशिष्ट आंबटपणा येतो.आंबट-गोड रिच चव येते.
६) सुरूवातीला तेलात किंवा तुपात तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि मोठी वेलची घालून याचा अर्क उतरू द्या. पण ग्रेव्ही वाटताना हे मसाले काढून टाका. जेणेकरून खाता ते मध्ये येणार नाहीत आणि सुगंध मात्र टिकून राहील.
७) हॉटेलममधल्या शाही पनीरमध्ये हलका गोडवा असतो. चवीचा समतोल साधण्यासाठी शेवटी अर्धा चमचा साखर किवा मध नक्की घाला. यामुळे टॉमेटोचा आंबटपणा आणि मसाल्यांचा तिखटपणा संतुलित होतो.
८) सर्वात महत्वाची टिप म्हणजे शेवटी कसुरी मेथी हातावर चोळून घाला आणि वरून एक चमचा साजूक तूप सोडा. यामुळे भाजीला जो शाही सुवास येतो.
