ढोकळा हा महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध नाश्ता आहे. हा गुजराथी पदार्थ लोकप्रिय आहे. विविध प्रकारचा ढोकळा केला जातो. त्यापैकी एक म्हणजे ज्वारीचा ढोकळा. त्यात फायबर आणि पोषणसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. (healthy Dhokla: Nutritious jawar dhokla is a great breakfast option, easy to make - easy to digest)हे पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा देते. हा ढोकळा हलका, मऊ आणि खूप चविष्ट लागतो. त्याला हिरवी चटणी किंवा मिठाईसारख्या पदार्थांसोबत खाल्ल्यास अजून स्वाद वाढतो. ज्वारीचा ढोकळा ग्लूटेन फ्री असल्यामुळे सगळ्यांसाठीच योग्य ठरतो. शिवाय करायला अगदी सोपा आहे. घरीच करा. वेळही फार लागत नाही.
साहित्य
ज्वारीचे पीठ, रवा, दही, पाणी, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, तेल, बेकींग सोडा, पांढरे तीळ, कडीपत्ता, मोहरी, जिरे
कृती
१. वाटीभर ज्वारीचे पीठ घ्यायचे. त्यात पाव वाटी रवा घालायचा. तसेच वाटीभर दही घालायचे. थोडे पाणी घालायचे आणि पीठ व्यवस्थित ढवळायचे. छान फेटायचे आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे.
२. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट करायची. कोथिंबीर बारीक चिरायची. तयार पिठात हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची. त्यात थोडे पाणी घालायचे आणि ढवळून घ्यायचे. चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर गरम तूप घालायचे. ढवळून घ्यायचे.
३. त्यात थोडा बेकींग सोडा घालायचा. ढोकळा पात्र घ्यायचे. त्याला थोडे तेल लावायचे आणि तयार केलेले मिश्रण त्यात ओतायचे. ढोकळा शिजवून घ्यायचा. २० ते २५ मिनिटांत मस्त ढोकळा शिजतो. ढोकळा ताटात काढून घ्यायचा. त्याचे तुकडे करायचे.
४. एका फोडणी पात्रात चमचाभर तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. तसेच कडीपत्त्याची पाने घालायची. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि पांढरे तीळ घालायचे. फोडणी छान खमंग करायची. नंतर ढोकळ्यावर ओतायची.