चहा दिवसातून दोनदा तरी हवाच. दुधाचा चहा, कोरा चहा, लिंबू चहा सारे प्रकार अगदी आवडीने आपण पितो. मात्र चहाचा एक जुना आणि आयुर्वेदिक प्रकार आहे जो चवीलाही मस्त लागतो आणि करायलाही अगदी सोपा आहे. पण त्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. (Have you ever tried Kashay tea? This type of tea is nutritious for health)आजकाल फार कमी केली जाणारी ही रेसिपी म्हणजे कषाय चहा. कषाय हा चहाचा एक प्रकार आहे जो आरोग्यासाठी फार फायद्याचा ठरतो. थंडीच्या दिवसांत हा चहा रोज प्या अनेक प्रकारे आरोग्य मस्त राहील. चहाची रेसिपी जरा वेगळी आहे.
साहित्य दूध, धणे, जिरे, काळीमिरी, सुंठ, लवंग, पाणी, वेलदोडे, खडी साखर
कृती१. अर्धी वाटी धणे, पाऊण वाटी जिरे, अर्धा चमचा किसलेली सुंठ एक चमचाभर काळीमिरीचे दाणे एक चमचाभर लवंग तव्यावर भाजून घ्यायचे. सुकेच भाजायचे त्याचा छान सुगंध आल्यावर गॅस बंद करा. किमान दोन ते तीन मिनिटे भाजायचे.
२. सारे पदार्थ भाजून झाल्यावर थोडावेळ गार करत ठेवायचे. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्याची सरसरीत अशी पूड वाटून घ्यायची. पूड हवाबंद डब्यात साठवून ठेवा. ही पूड करायला फार वेळ लागत नाही त्यामुळे एकदाच भरपूर करुन ठेवण्याऐवजी चहा प्यायची इच्छा असताना ताजी मस्त पूड तयार करुन वापरा.
३. एका पातेल्यात एक कप पाणी आणि दोन कप दूध घ्यायचे. पाण्यापेक्षा दूध जास्त घ्यायचे. हे प्रमाण लक्षात ठेवायचे. दूध जरा उकळ्यावर त्यात ही तयार केलेली पूड तीन चमचे घालायची. त्यात थोडी खडी साखर घालायची. तुम्हाला जर गोड नको असेल तर साखर नाही घातली तरी चालेल. भरपूर उकळायची. पाणी आणि दुधाचे मिश्रण आटून अर्धे होईल. मग तो चहा गाळायचा आणि गरमागरम प्यायचा.
पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात हा चहा रोज पिणे आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. या चहामुळे सर्दी खोकला बरा होतो. तसेच चवीला एकदम फक्कड लागतो आणि करायलाही अगदीच सोपा आहे. कषाय चहा तुम्हीही नक्की करुन पाहा.