भेंडी ही भाजी अशी एक भाजी आहे की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक सगळ्यांनाच आवडते. साधी, घरगुती आणि तरीही खास अशी भेंडीची भाजी भारतीय स्वयंपाकघरात कायमच जागा धरुन आहे. रोजच्या जेवणात, डब्यात, प्रवासात किंवा पाहुण्यांसाठीही भेंडीची भाजी आवर्जून केली जाते. लहान मुलांसाठी तर ही भाजी जणू मेजवानीच असते. गरमागरम पोळीसोबत खमंग भेंडीची भाजी मुले आवडीने खातात. (Have you ever eaten the crispy and crunchy okra made in peanut masala? must try this recipe)भेंडीचा स्वाद सौम्य असतो, त्यामुळे ती फार तिखट किंवा मसालेदार न करताही चविष्ट लागते. कुरकुरीत, कोरडी किंवा किंचित रसदार अशा विविध प्रकारे भेंडी केली तरी तिची चव टिकून राहते. त्यामुळे ज्यांना फार मसालेदार पदार्थ आवडत नाहीत, त्यांनाही भेंडीची भाजी सहज आवडते. भाजीमध्ये चिकटपणा येऊ नये म्हणून योग्य काळजी घेतली तर भेंडी खूपच छान लागते. त्याची मसालेदार भाजीही करता येते आणि त्याची कुरकुरीत भाजीही करता येते.
एकदा भेंडीची ही शेंगदाण्याच्या मसाल्यातली भाजी करुन पाहा. अगदी कमी कष्टात आणि कमी वेळात होते. करायला अगदी सोपी आहे. दिसतेही मस्त. तसेच करायला साहित्यही मोजकेच लागते. पाहा काय करायचे.
साहित्य
भेंडी, शेंगदाणे, पांढरे तीळ, जिरे, बडीशेप, हळद, लाल तिखट, धणे पूड, आमचूर पूड, तेल, कडीपत्ता, मीठ
कृती
१. भेंडी स्वच्छ पुसून घ्यायची. भेंडीचे मध्यम आकाराचे काप करायचे. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले आणि सोललेले शेंगदाणे घ्यायचे. थोडे पांढरे तीळ घ्यायचे. तसेच चार ते पाच चमचे जिरे घ्यायचे. चमचाभर लाल तिखट आणि चमचाभर हळद घ्यायची. थोडी आमचूर पूड घ्यायची. थोडी भाजलेली बडीशेप घ्यायची. मसाला जाडसर वाटून घ्यायचा.
२. पॅनमध्ये दोन ते चार चमचे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात थोडे जिरे घालायचे. नंतर कडीपत्ता घालायचा. परतायचे आणि नंतर त्यात भेंडी घालायची. भेंडी छान खमंग परतून घ्यायची. जरा कुरकुरीत व्हायला लागली की त्यात तयार केलेला शेंगदाण्याचा मसाला घालायचा. मसालाही छान परतायचा. झाकण ठेवले तर भाजी मऊ होते. असेच परतले तर भाजी छान कुरकुरीत होते. मसाला जळणार नाही यासाठी तेलाचे प्रमाण आणि गॅसची फ्लेम योग्य हवी. चवीनुसार त्यात मीठ घालायचे. मीठ आधीच घातले तर भाजी मऊ होते. त्यामुळे मीठ शेवटी घाला.
