साऊथ इंडियन स्टाइल चटणी विविध प्रकारे करता येतात. त्यापैकी एक मस्त रेसिपी म्हमजे ही नीर चटणी. नीर चटणी एकदम सोपी, हलकी आणि तरीही चवीला उत्तम असते. ही चटणी पाण्यासारखी पातळ असते. तरी चवीला पाणचट न लागता चवदार लागते. (good to digest, easy to make and rich in flavor - Neer Chutney! must try making it once )नीर चटणी करायला सोपी असते कारण यात फारसे पदार्थ आणि मसाले वापरले जात नाहीत. नीर चटणी डोसा, इडली, आप्पे किंवा भातासोबतही खूप छान लागते. पातळ असल्यामुळे ती पदार्थावर नीट पसरते आणि प्रत्येक घासात चटणीची चव लागते. लहान मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी तसेच मसालेदार अन्न न पचणाऱ्यांसाठी ही चटणी योग्य ठरते.
साहित्य
चणाडाळ, नारळ, शेंगदाणे, पाणी, हिरवी मिरची, चिंच, लसूण, कोथिंबीर, कडीपत्ता, तेल मोहरी, हिंग, सुकी लाल मिरची, उडीद डाळ, मीठ
कृती
१. चणाडाळ मस्त भाजून घ्यायची. शेंगदाणे सोलायचे आणि मग भाजून घ्यायचे. ताजा नारळ घ्यायचा. त्याचे पातळ तुकडे करायचे. खवलेला असेल तर आणखी उत्तम. हिरव्या मिरचीचे लहान तुकडे करायचे. तसेच चिंचेच्या बिया काढून त्याचा अगदी लहान चवीपुरताच तुकडा घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या.
२. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेली चणाडाळ घ्यायची. त्यात भाजलेले शेंगदाणे घालायचे. तसेच त्यात नारळ घालायचा आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. थोडी चिंच घाला आणि मग लसणाच्या पाकळ्याही घाला. त्यात निवडलेली कोथिंबीर घाला. मिक्सरमधून वाटून घ्या.
३. त्यात पाणी घाला आणि पुन्हा वाटा. एकजीव चटणी तयार करा. नंतर एका खोलगट पातेल्यात चटणी काढा आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून ते चटणीत टाका. एका फोडणी पात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. थोडी उडदाची डाळ घालायची. मोहरी आणि डाळ तडतडल्यावर त्यात सुक्या लाल मिरचीचे तुकडे घालायचे. थोडा कडीपत्ता घालायचा. थोडे हिंग घालायचे. फोडणी छान खमंग झाल्यावर चटणीत ओतायची. चवीनुसार मीठ घालायचे.
४. चटणी छान एकजीव करायची. मस्त गरमागरम इडली, डोसा, मेदूवडा सगळ्यासोबत मस्त लागते. नक्की करा.
