हिरवे मूग चवीला आवडत नाहीत? अगदीच फिके लागतात असे वाटत असेल तर तुम्ही एकदा ही रेसिपी करुन पाहा. (Give a different taste - Mughlai green moong curry will make your mouth water, easy recipe)साध्या हिरव्या मुगांची भाजी एवढी चविष्ट होऊ शकते असा विचारही केला नसेल. मुघलाई पनीर खाल्लेच असेल त्याच प्रमाणे मुघलाई मुगही करता येतात. पाहा सोपी आणि मसालेदार रेसिपी.
साहित्य
हिरवे मूग, तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग, तेल, तूप, जिरे, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, दही, साय, पाणी, कसुरी मेथी, धणे पूड
कृती
१. एका पातळ कॉटनच्या कापडाच्या तुकड्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग असे सुके मसाले एकत्र करायचे. त्याची पुडी तयार करायची. हिरवे मूग रात्रभर भिजवायचे. किमान तीन तास तरी भिजवायचे. नंतर एका कुकरच्या भांड्यात मूगडाळ घ्यायची. त्यात तयार केलेली पुडी ठेवायची. नंतर त्यात थोडे मीठ आणि पाणी घालायचे. कुकर लावायचा आणि डाळ मस्त शिजवून घ्यायची.
२. एका कढईत तेल गरम करत ठेवायचे. कांदा सोलायचा आणि मग बारीक लांब चिरायचा. तेलातून सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा. निथळत ठेवायचा. नंतर एका कढईत थोडे तूप घ्यायचे. तुपावर जिरे छान परतून घ्यायचे. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि गुलाबी होईपर्यंत परतायचा. एकीकडे आले लसूण पेस्ट तयार करायची. कांदा परतल्यावर त्यात चमचाभर ती पेस्ट घालायची. बारीक चिरलेली हिरवी मिरचीही घालायची.
३. फोडणी मस्त खमंग परतून झाल्यावर त्यात थोडी हळ घाला. थोडे लाल तिखट घाला. तसेच धणे पूडही घाला. सगळे मसाले मस्त परतून घ्या. परतून झाल्यावर अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्या. त्यात छान ताजे गोड दही घालायचे. ढवळायचे आणि मसाला एकजीव करायचा. त्यात शिजवलेले मूग घालायचे.
४. त्यात थोडी साय घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. तळलेला कांदा आणि हातावर मळलेली कसुरी मेथी घालायची. एक वाफ काढायची. भातासोबत खा किंवा पोळीसोबत एकदम मस्त लागते.
