आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये एक चव कायमची घर करुन बसलेली असते . ती म्हणजे केळं आणि तुपाची! आजी-आई सकाळी उठल्यावर किंवा शाळेत जाण्यापूर्वी हातात एक वाटी देत असत. त्यात मऊ पिकलेलं केळं, त्यावर एक चमचा तूप आणि थोडी साखर असे मिश्रण असायचे. त्या वेळी ते फक्त गोड आणि मऊ लागायचं म्हणून खायचो. (Ghee-banana is a treasure trove of nutrition!! This mixture will be beneficial in today's lifestyle)मात्र ते खाण्याचे फायदे माहिती नव्हते. आजकाल असे मिश्रण खाताना फार कोणी दिसत नाही. पण त्यात आरोग्याचा खजिनाच दडलेला होता हे आता समजतं. त्यामुळे हे पारंपरिक मिश्रण पुढच्या पिढीलाही नक्की खायला द्या.
केळं हे सर्व वयोगटांसाठी योग्य असलेलं फळ आहे. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, जीवनसत्त्व बी६ आणि नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ते त्वरीत ऊर्जा देणारं आणि पचनास हलकं असतं. तूप म्हणजे आयुर्वेदात 'सर्वश्रेष्ठ स्नेहद्रव्य'. तूप शरीरातील कोरडेपणा कमी करतं, मेंदूची कार्यक्षमता वाढवतं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्ले जातात, तेव्हा शरीराला संपूर्ण पोषण मिळतं.
पचन सुधारण्यास मदत:
आजच्या अस्थिर जीवनशैलीत बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होतो. केळ्यातील फायबर आणि तुपातील पोषण एकत्रितपणे पचनसंस्थेला सुरळीत ठेवतात. त्यामुळे अन्न सहज पचतं आणि पोट हलकं राहतं. लहान मुलं किंवा वयोवृद्धांसाठी हे उत्तम नैसर्गिक औषध मानलं जातं.
ऊर्जा आणि ताकद देणारा पदार्थ:
केळं आणि तूप हे शरीराला त्वरीत ऊर्जा देतात. सकाळी व्यायामानंतर किंवा अभ्यासाआधी हे घेतल्यास शरीरात ताजेतवानेपणा येतो. खेळाडूंसाठी, शारीरिक श्रम करणार्यांसाठी किंवा मुलांच्या वाढीसाठी हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे.
त्वचा आणि केसांसाठी लाभदायी:
तुपामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि केळ्यातील नैसर्गिक जीवनसत्त्वे त्वचेचा ओलावा टिकवतात. त्वचा मऊ, तजेलदार आणि आरोग्यदायी राहते. नियमित खाल्यास केस गळणे कमी होते आणि त्यांना नैसर्गिक चमक येते.
मेंदू आणि मनासाठी उपयुक्त:
तुपात असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स आणि केळ्यातील पोटॅशियम मेंदूला पोषण देतात. स्मरणशक्ती वाढवतं, एकाग्रता सुधारतं आणि ताण कमी करण्यास मदत करतं. लहान मुलांना अभ्यासात लक्ष केंद्रीत ठेवण्यासाठी आणि वयोवृद्धांमध्ये मानसिक स्थैर्य राखण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.
