रोज- रोज पोळ्या लाटायचा कंटाळा येतो. दिवसा भात खाऊनही चालत नाही. झोप येते. तरी नाश्ता, डबा, जेवण करण्याचा नेम चुकत नाही. अशा वेळी नवनवीन रेसेपी करण्याकडे गृहिणींचा कल असतो. एवढेच काय तर बॅचलर मुलेही सोप्या रेसिपीजच्या शोधात असतात. अशातच काही चमचमीत पर्याय मिळाला तर? चला पाहूया ग्लूटेन फ्री ज्वारीचा सेट डोसा आणि चटपटीत टोमॅटो चटणी!
सेट डोसा सध्या ट्रेंडिंग आहे. लुसलुशीत, जाळीदार डोसा आणि चटणी नाश्त्याला मिळाले, तर पोट तृप्त आणि मनही तृप्तच होते. अशातच डाएट वाल्यांसाठी ज्वारीचा डोसा उपयुक्त ठरेल. करायला सोपा आणि चवीला, तब्येतीला उत्तम. पाहूया रेसेपी -
ज्वारीचा सेट डोसा -
साहित्य : ज्वारीचे पीठ, रवा, दही, मीठ, पाणी, चिमूटभर खाण्याचा सोडा.
कृती :
>> एका मिक्सर जारमध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी रवा, पाव वाटी दही, चवीनुसार मीठ आणि अर्धा पेला पाणी घालून मिश्रण ढवळून घ्या.
>> तयार मिश्रणात गरजेनुसार पाणी आणि चिमूटभर सोडा घालून मिश्रण ढवळून घ्या.
>> गॅसवर तवा ठेवून तो तापत आल्यावर मध्यम आचेवर सेट डोसा बॅटर टाकून घ्या.
>> डोशावर बुडबुडे येऊ लागले की तेल घालून डोसा पलटून घ्या.
>> तीन-चार मिनिटात सेट डोसा तयार. याबरोबर तुम्ही खोबर्याची चटणी किंवा पूड चटणीही घेऊ शकता. नवीन काही ट्राय करायचे असेल तर पुढील रेसेपी पहा-
टोमॅटो चटणी
साहित्य : तीन टोमॅटो, एक कैरी, ८-१० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, तिखट पावडर, १ चमचा तेल, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर
कृती :
>> एका पॅनमध्ये तेल घालून त्यावर सगळे साहित्य व्यवस्थित परतून घ्या.
>> साहित्य गार झाले की टोमॅटोचे साल काढून सगळे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
>> चवीनुसार तिखट, मीठ आणि टोमॅटोची आंबट चव बॅलेन्स करण्यासाठी चिमूटभर साखर घाला.
ज्वारीचा सेट डोसा आणि चटपटीत चटणी गरमागरम सर्व्ह करा, पहा प्रत्यक्ष कृती -