कितीही काही केले तरी मुले हिरव्या भाज्या खायला नाही म्हणतात. अशा वेळी मग त्यांना चविष्ट पदार्थांत लपवून या भाज्या देतात येतात. जसे की पालक. वाढीच्या वयात मुलांना योग्य पोषण मिळणे अत्यंत गरजेचे असते. (Even children will love spinach, make spinach pancakes in 10 minutes - nutritious dish for lunch box)अशा वेळी पालक हा मुलांच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी उत्तम असतो. पालक ही पालेभाजी अनेक पोषणतत्त्वांनी भरलेली असल्याने ती मुलांच्या सर्वांगीण वाढीस मदत करते.
पालकात भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे रक्तनिर्मिती चांगली होते आणि अशक्तपणा येण्याचा धोका कमी होतो. लहान मुलांमध्ये थकवा, चिडचिड किंवा भूक न लागणे यामागे अनेकदा लोहाची कमतरता कारणीभूत असते. त्यामुळे मुलांना या पद्धतीने पालकाचा पॅनकेक किंवा मिनी डोसा खाऊ घाला. त्यांना नक्कीच आवडेल. पालकाचे पॅनकेक्स चविष्ट असल्याने मुले ते आवडीने खातात आणि नकळत लोह मिळते.
साहित्य
पालक, दही, हिरवी मिरची, आलं, रवा, जिरे, मीठ, इनो, पाणी, तूप
कृती
१. एका खोलगट पातेल्यात कोमट पाणी घ्यायचे. त्यात थोडे मीठ घालायचे. त्यात निवडलेला पालक घालायचा. स्वच्छ धुवायचा. मग पालक चिरुन घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचे तुकडे करायचे. रवा चाळून घ्यायचा.
२. एका मिक्सरच्या भांड्यात रवा घ्यायचा. त्यात पालक घालायचा. तसेच थोडं जिरं घालायचं. त्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि आल्याचा तुकडाही घालायचा. दही घालायचे. मिक्सरमधून वाटून त्याची एकजीव आणि जरा घट्ट पेस्ट तयार करायची. गरजेनुसार पाणीही वापरायचे. पेस्ट छान एकजीव तयार झाली की त्यात अगदी थोडे इनो घालायचे. ढवळून घ्यायचे आणि मिश्रणात काही तुकडे राहणार नाही याची काळजी घ्यायची.
३. गॅसवर तवा तापवायचा. तवा जरा तापला की तव्याला तूप लावायचे. नंतर त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे लहान गोल लावायचे. दोन्ही बाजून मस्त खमंग परतून घ्यायचे. इडलीच्या आकाराचे पॅनकेक्स तयार करायचे. चवीला फार मस्त लागतात.
