उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पोटासाठी हलके असलेले पदार्थ खाणे गरजेचे असते. अशा पदार्थांमध्ये दही हा अतिशय उपयुक्त पर्याय मानला जातो. दही पचायला हलके असते, पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करते आणि शरीराला ताजेतवाने ठेवते. (Eating Curd in Summer: 4 Things to Remember to Avoid Cold and Digestive Issues)त्यामुळे अनेक जण उन्हाळ्यात रोज दही खाण्याची सवय लावतात. मात्र दही योग्य पद्धतीने खाल्ले नाही तर काहींना सर्दी, घसा खवखवणे किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे दही खाताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दही वजन कमी करण्यासाठीही फायद्याचे असते. फक्त खायची पद्धत जास्त महत्वाची.
दही खाण्यासाठी दुपारची वेळ सर्वात चांगली मानली जाते. दुपारच्या वेळी पचनशक्ती चांगली असते, त्यामुळे दही सहज पचते आणि त्याचा शरीराला अधिक फायदा होतो. दही खाताना ते ताजे असणेही महत्त्वाचे आहे. ताज्या दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. साधे दही खाण्याऐवजी त्यात थोडे मीठ, साखर किंवा भाजलेले जिरे घातले तर त्याची चवही वाढते आणि ते पोटासाठीही हलके होते. जिरे पूड आणि दही अगदी उत्तम असे कॉम्बिनेशन आहे. उन्हाळ्यात दही भात, ताक किंवा लस्सीच्या रुपातही दही घेतले तर शरीराला अधिक थंडावा मिळतो. फक्त लस्सीचा वजन कमी करण्याशी काहीच संबंध नाही.
दही खाताना काही गोष्टी टाळल्यास सर्दी किंवा कफ होण्याची शक्यता कमी होते. उदाहरणार्थ, फ्रिजमधून काढलेले खूप थंड दही लगेच खाणे टाळावे. असे दही थोडा वेळ बाहेर ठेवून मग खाल्ले तर ते शरीरासाठी अधिक योग्य ठरते. तसेच रात्री दही खाणे टाळणेही महत्वाचे मानले जाते, कारण रात्री दही खाल्ल्याने सर्दी किंवा घशाचे त्रास होऊ शकतात. ज्यांना आधीच सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असेल त्यांनी दही कमी प्रमाणात खाणे योग्य ठरते.
एकूणच, उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र योग्य वेळेत, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दही खाल्ले तरच त्याचा खरा फायदा मिळतो. त्यामुळे साध्या सवयी न चुकता केल्या तर सर्दी-बाधेची चिंता न करता दह्याचा थंडावा आणि चव दोन्ही अनुभवता येतात. दही आहारात नक्कीच असावे. फक्त खाताना काळजी घ्या. जेणेकरुन ते बाधणार नाही आणि आरोग्यही छान राहील.
