विड्याचे पान खाण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत शतकानुशतके आहे. जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने पचन सुधारते, तोंडातील दुर्गंधी कमी होते, घसा ओलसर राहून सूज कमी होण्यास मदत होते आणि शरीराला हलकी उबही मिळते. (Eating betel leaves is good for digestion, but never eat them this way, many people make this mistake)पानातील नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात, तर त्यातील सुगंधी तेलं श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतात. मात्र हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा विड्याचे पान योग्य प्रकारे आणि योग्य सवयींसह खाल्ले जाते. चुकीच्या पद्धतीने खाल्लेले पान आरोग्यासाठी चांगल्यापेक्षा नुकसानदायीही ठरु शकते.
विडा खाताना सर्वसाधारणपणे केली जाणारी पहिली चूक म्हणजे पानात तंबाखू, गुटखा किंवा सुगंधी पदार्थ घालणे. हे घटक पचनावर, फुफ्फुसांवर व तोंडाच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करतात आणि विड्याच्या पानाचे नैसर्गिक फायदे पूर्णपणे कमी करतात. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात चुना लावणे ही दुसरी मोठी चूक. चुना तोंडातील आग वाढवतो, लालसरपणा व जखमा निर्माण करतो आणि दीर्घकाळात तोंडाच्या आजारांना आमंत्रण देतो. विड्याचे पान आरोग्यासाठी म्हणून खायचे असेल तर ते नुसतेच खावे. फक्त पानच खायचे. त्यात थोडा गुलकंद किंवा बडीशेप घालणे चांगले ठरते.
विड्याचे पान नेहमी ताजे, गडद हिरवे आणि स्वच्छ असावे; पिवळे पडलेले, कोमेजलेले किंवा छिद्र पडलेले पान वापरल्यास पचन बिघडण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचा तिखटपणा अधिक त्रासदायक होतो. त्यामुळे विड्याचे ताजे छान पानच खावे. विड्याचे पान खाताना अतिरेक टाळणे हेसुद्धा खूप गरजेचे आहे. दिवसभर वारंवार पान खाल्ल्याने दातांवर डाग पडतात, संवेदनशीलता वाढते आणि लाळेचे प्रमाण बिघडू शकते. विडा केवळ जेवणानंतर किंवा पोटफुगी, पचन बिघडणे, जिभेवर कोरडेपणा यांसारख्या समस्यांमध्ये मर्यादित प्रमाणात खाल्ल्यासच तो अधिक प्रभावी ठरतो. काही लोक पानात गोड सुपारी किंवा रंगीत सुगंधी पदार्थ घालतात, पण हे कृत्रिम घटक पोट बिघडवू शकतात आणि तोंडातील नैसर्गिक बॅक्टेरियाचे संतुलन बिघडवतात.
योग्य पद्धतीने खाल्ल्यास विड्याचे पान अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ते पचनक्रिया सुधारते, वायुप्रकोप शांत करते, तोंडातील जंतू कमी करते आणि शरीरात नैसर्गिक उष्णता टिकवते. त्यामुळे विडा खाण्याचे फायदे मिळवायचे असतील तर पानाची निवड, त्यात घालण्यात येणारे पदार्थ आणि खाण्याची वेळ याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. नैसर्गिक, साधा आणि ताजा विडा हेच आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
