स्वयंपाकघरात अनेक डाळींचा वापर केला जातो, त्यापैकी उडीद डाळ ही अत्यंत महत्त्वाची आणि पौष्टिक डाळ मानली जाते. दिसायला साधी असली तरी तिच्यात पोषणाचा मोठा साठा असतो. (eat urad dal everyday This simple dal is beneficial for health, eat it regularly )उडीद डाळ उपमा, वडे, डोसा, इडली यांसारख्या पदार्थांत वापरली जातेच, पण फोडणीतही ती नियमितपणे वापरली जाते. या छोट्याशा सवयीमागे फक्त चव नव्हे, तर आरोग्याचाही विचार दडलेला असतो.
उडीद डाळ आहारात असावी याचं प्रमुख कारण म्हणजे ती शरीराला ऊर्जा आणि ताकद देते. ही डाळ पौष्टिक म्हणून ओळखली जाते. नियमित उडीद डाळ खाल्ल्याने शरीराचा कमकुवतपणा कमी होतो. स्नायूंना बळ मिळतं आणि रक्तशुद्धी होते. थकवा, सांध्यातील वेदना किंवा अशक्तपणा यांसारख्या त्रासात उडीद डाळ उपयोगी ठरते.
फोडणीत उडीद डाळ घालण्याची पद्धत आपल्या स्वयंपाकात खूप जुनी आहे. फोडणी म्हणजे केवळ पदार्थाची चव वाढवणं नव्हे, तर त्याला पौष्टिक मूल्य देणंही आहे. उडीद डाळ तेलात थोडी परतल्याने तिचं पचन अधिक सुलभ होतं आणि तिच्यातील पोषक घटक पदार्थात मिसळतात. फोडणीत उडीद डाळ घातल्याने पदार्थाला हलका कुरकुरीतपणा येतो, आणि ती फोडणी पचनास सोपे होते. म्हणूनच उपमा, पोहे, भाजी किंवा चटणीच्या फोडणीत उडीद डाळ घालणं आरोग्यदायी ठरतं. पांढरी उडीद डाळ म्हणजे सोललेली उडीद डाळ. ती लवकर शिजते आणि पचनास सोपी असते. म्हणूनच ती इडली, डोसा किंवा वड्यासाठी वापरली जाते. तिच्यातील चिकटपणा फर्मेंटेशन प्रक्रियेला मदत करतो, ज्यामुळे हे पदार्थ मऊ आणि फुललेले होतात. त्यामुळे दक्षिण भारतीय स्वयंपाकात पांढऱ्या उडीद डाळीला विशेष महत्व आहे.
उडीद डाळीत प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि जीवनसत्त्व बी कॉम्प्लेक्स यांसारखी अनेक पोषणसत्त्वं असतात. हे सगळे घटकं शरीराला ऊर्जा देतात, हाडं मजबूत ठेवतात आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात. उडीद डाळ खाल्ल्याने त्वचा आणि केसांच्या आरोग्यालाही फायदा होतो. त्यातील तंतुमय घटक पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून संरक्षण करतात.
