बेसन पोळं तर आपण सगळे आवडीने खातो. तेलाचा वापर कमी केला तर ते पौष्टिकही ठरते. पोळ्याचा आणखी एक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार म्हणजे मूगडाळीचे पोळे. करायला सोपे आणि चवीलाही मस्त .त्यात भाज्या घालून त्याची चव वाढवता येते आणि पोषणही. करायला फार वेळ लागत नाही. झटपट होते. पाहा अगदी मस्त रेसिपी. नाश्त्यासाठी नक्की करुन पाहा. सगळ्यांनाच आवडेल.
साहित्य
बेसन, मूगडाळ, पालक, कांदा, दही, धणे, जिरे, लसूण, पाणी, आलं, गाजर, मीठ, हिंग, तेल, ओवा
कृती
१. मूगडाळ रात्रभर भिजत ठेवायची. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. गाजराची सालं काढून घ्यायची. गाजर किसून घ्यायचे. पालक स्वच्छ धुवायचा. नंतर निवडायचा आणि बारीक चिरायचा. धणे , जिरे आणि ओवा चमचाभर घ्यायचे. त्याची पूड तयार करायची. मिक्सरचा वापर करा किंवा मग कुटून पूड तयार करा.
२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या आणि बारीक चिरुन घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात मूगडाळ घ्यायची. त्यात लसणाच्या काही पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि थोडे पाणी घाला. वाटून त्याची एकजीव पेस्ट तयार करा. एका खोलगट भांड्यात ती पेस्ट घ्या, त्यात बारीक चिरलेला पालक घाला. तसेच किसलेले गाजरही घाला. लसूण घाला. थोडे दही घाला. चमचाभर हिंग घाला. तयार केलेली धणे - जिरे - ओवा पूडही घाला.
३. त्यात दोन चमचे बेसन घालायचे आणि मिक्स करायचे. थोडे मीठ घाला आणि घट्ट मिश्रण तयार करा. जास्त पातळ करु नका. पाणी जर गरज असेल तरच घाला. तव्याला तेल लावा आणि तवा गरम करा. मग त्यावर मिश्रण लावा आणि पसरवा. जाडसर थर लावा. दोन्ही बाजूनी कुरकुरीत करा. गरमागरम खा.
