थंडीचे दिवस आले की शरीराला उबदार ठेवणार्या आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देणार्या पदार्थाची गरज भासते. अशावेळी गरमागरम मसाला चहा म्हणजे एक नैसर्गिक औषधच ठरतो. सुंठ, आलं, लवंग, वेलची आणि इतर काही मसाल्यांच्या मिश्रणाने तयार होणारा हा खास चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, घशातील खवखव कमी करतो आणि शरीराला आतून उब देतो. चहा तर पितच असाल एकदा असा मसाला चहाही करुन पाहा. करायला सोपा आणि चवीला जबरदस्त.
साहित्य
पाणी, दूध, गवती चहा, सुंठ, आलं, लवंग, वेलची, दालचिनी, काळीमिरी, तुळशीची पानं, गूळ, चहा पूड
कृती
१. एका पातेल्यात पाणी घ्यायचे. गरम करत गॅसवर ठेवायचे. त्यात किसलेलं आलं घाला. तसेच सुंठ पूडही घालायची. दोन ते तीन लवंग घालायच्या. थोडी वेलची तसेच थोडी दालचिनी आणि काळीमिरीही घालायची.
२. हे सर्व घटक मंद आचेवर ५–७ मिनिटे उकळू द्यायचे, म्हणजे त्यांच्या सुगंधी घटकांचा अर्क पाण्यात उतरतो. पोषण आणि सुगंध दोन्ही मिळतो. तसेच चवही छान लागते. घशासाठी हा चहा एकदम मस्त ठरतो.
३. आता त्यात तुळशीची पानं आणि गवती चहा घालून पुन्हा थोडं उकळा चहाला जरा हिरवट रंग येतो. पाती चहा फक्त सुगंधासाठी नाही तर पोषणासाठीही फायद्याचा असतो.
४. नंतर त्यात दूध घाला आणि अजून दोन मिनिटे उकळू द्या. पाणी घालून चहा करायचा नसेल तर फक्त दुधाचाही स्पेशल चहा करता येतो. चवीला एकदम मस्त असतो. त्यात थोडा किसलेला गूळ घालायचा. थोडी चहा पूड घालून उकळायचे.
हा चहा केवळ चवीला अप्रतिम नसून आरोग्यदायीही आहे. सुंठ आणि आलं शरीराला उब देतात, लवंग आणि वेलची सर्दी-खोकला कमी करतात, तर तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हिवाळ्यात रोज सकाळी किंवा संध्याकाळी असा मसाला चहा घेतल्यास शरीर थंडीतही ऊर्जादायी आणि चविष्ट राहते.
