टोमॅटो रस्सम तसेच टोमॅटोचे सार आपण खातोच. पण एकदा या पद्धतीने केलेले टोमॅटो सांबार खाऊन पाहा. (Do you like spicy food during monsoon? make this hot tomato sambar, quick and easy recipe)आमटी म्हणा किंवा इतर काही नाव घ्या. चवीला हा पदार्थ एकदम जबरदस्त आहे. करायला तर एकदमच सोपा आहे. डाळ शिजवायची गरज नाही किंवा काही उकडायची गरज नाही. झटपट करता येते अशी रेसिपी आहे.
साहित्य
टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, मोहरी, तेल, कडीपत्ता, पाणी, मीठ, हळद, हिंग, हिरवी मिरची, कांदा, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट
कृती
१. हिरव्या मिरचीचे लांब आणि पातळ काप करायचे. लसणाच्या पाकळ्या सोलायच्या. लसूण जरा जास्त घ्यायची. सोलून झाल्यावर लसूण जरा ठेचायची. बारीक करु नका. फक्त जरा ठेचायची. कोथिंबीर छान बारीक चिरायची आणि मग कांदा घ्यायचा, सालं काढायची आणि मस्त बारीक चिरायचा.
२. टोमॅटो घ्यायचे आणि त्याला मधोमध चिर द्यायची. एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचे. त्यात टोमॅटो घालायचे आणि उकळायचे. साले निघायला लागली की गॅस बंद करा आणि पाणी ओतून टाका. टोमॅटो जरा गार झाले की सालं काढून टाका आणि मस्त टोमॅटोची पेस्ट करा. पाणी न घालता वाटून घ्यायचे.
३. एका कढईत तेल घ्यायचे. जरा गरम झाले की त्यात भरपूर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. नंतर त्यात कडीपत्ता घालायचा आणि तो ही छान परतायचा. मग त्यात हिरवी मिरची घाला आणि ठेचलेला लसूण घालून परतून घ्या. लसूण मस्त लालसर होईपर्यंत परतायचा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि गुलाबी परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट घालायची. जरा वेळ ढवळायची मग त्यात चमचाभर लाल तिखट तसेच चमचाभर हळद घाला. तसेच धणे पूड आणि जिरे पूडही घाला. छान परतून घ्या. मसाले शिजू द्या.
४. गरजे पुरते पाणी घाला आणि उकळत ठेवा. झाकण ठेवायचे आणि मस्त उकळू द्यायचे. खमंग वास सुटल्यावर गॅस बंद करा आणि गरमागरम भातावर तूपाची धार सोडून नंतर हा पदार्थ घ्यायचा. तसेच इडली आणि वड्यासोबतही खाऊ शकता.