दिवाळीत केली जाणारी बोरं हा एक पारंपरिक आणि खास गोड पदार्थ आहे. नावाने जरी फळासारखा वाटला तरी हा बेसन, तांदूळाचे पीठ, ज्वारी अशा विविध पिठांचा केला जाणारा हा पदार्थ आहे. हा साखर किंवा गूळ वापरुन तयार केला जाणारा छोटासा गोल आकाराचा गोड पदार्थ असतो. (Diwali traditional recipe: Faral Bora is made in every household in Konkan, eat authentic diwali food)दिसायला तो खऱ्या बोरासारखा असल्यामुळे त्याला बोरं असे नाव पडले असावे. बोरं दिवाळीच्या फराळात खास असतात. हा पदार्थ कुरकुरीत, गोड आणि सुगंधी असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पारंपरिक गोड पदार्थ सणाचा आनंद अधिक वाढवतो. पूर्वी घराघरांत हाताने केली जाणारी बोरं केली जायची. यंदाही प्रेमाने करा आणि दिवाळीच्या ताटात त्यांचा समावेश करुन घ्या. करायला अगदी सोपी असतात. तांदळाच्या पिठाची बोरं कशी करायची ते जाणून घ्या.
साहित्य
तांदूळाचे पीठ, गूळ, पाणी, रवा, पांढरे तीळ, वेलची पूड, मीठ, तेल
कृती
१. तांदूळाचे पीठ घ्यायचे. व्यवस्थित चाळायचे. चाळून झाल्यावर त्यात रवा घालायचा. दोन वाटी तांदूळाचे पीठ असेल तर अर्धी वाटी रवा घ्यायचा. पाणी गरम करायचे. त्यात गूळ घालायचा आणि गूळ विरघळू द्यायचा. गूळ छान विरघळल्यावर पाणी गार करत ठेवायचे.
२. पिठात थोडे पांढरे तीळ घालायचे. तसेच चमचाभर वेलची पूड घालायची. अगदी थोडे मीठ घालायचे. सारे पदार्थ छान एकजीव करायचे. नंतर त्यात तयार केलेले गूळ पाणी ओतायचे आणि पीठ मळून घ्यायचे. मस्त मध्यम घट्ट असे पीठ मळायचे. पीठ मळून झाल्यावर त्याचे लहान गोळे करायचे.
३. कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल तापल्यावर गॅस मध्यम ठेवायचा आणि त्यात बोरं तळून घ्यायची. मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात. आत मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत होतात.