दिवाळीच्या(Diwali 2025) खूप दिवस आधी फराळाचे पदार्थ तयार करून उपयोग नाही, एक तर चव बदलते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदार्थ दिवाळी आधीच संपतात. म्हणून स्मार्ट सुगरणी दिवाळीच्या तीन-चार दिवस आधीच फराळ करतात. पूर्वीच्या काळी बायका त्यासाठी तळणीच्या वेळा पाहून फराळ तयार करत असत. आताही सोशल मीडियामुळे या वेळा व्हायरल होत आहेत. त्यामुळे तुम्हीही फराळ तयार करायला सुरुवात केली नसेल तर या वेळा फॉलो करून बघा, पदार्थ तेल कमी प्यायले तर त्यात आपलाच फायदा आहे, नाही का? पहा अशीच एक व्हायरल पोस्ट!
ऑक्टोबरच्या पुढील तारखा :
१६ : दुपारी १.३० ते ४.३०
१७ : दुपारी २.१५ ते ५.१५
१८ : दुपारी ३ ते ६
१९ : दुपारी ३.४५ ते ६.४५
२०: सायंकाळी ४.३० ते ७.३०
२१ : सायंकाळी ५.१५ ते ८.१५
२२ : सायंकाळी ६ ते ९
२३: सायंकाळी ६.४५ ते ९.४५
२४: सायंकाळी ७.३० ते १०.३०
२५: रात्री ८.१५ ते ११
या वेळा ठरतात कशा? तर भरती!ओहोटीवरून! एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते आणि ते पदार्थ ही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते, परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.
जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला, तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते. मग, भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ? ती वृत्तपत्रात किंवा नेटवर मिळतेच, पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत.
दिनदर्शिकेवर आजची तिथी बघावी, उदारणार्थ आजची कृ. २ आहे , तिथी कृ. २ × ३/४ = १.५ , आता १.५ म्हणजे दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. (सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत) पण जर तुम्ही दुपारी १.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.
जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू, तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात. हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा; विशेष करून केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्यांनी या वेळा फॉलो करा.