हिवाळ्याच्या (Winter Recipes) दिवसांत वातावरणातील गारवा वाढतो आणि शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे लागते. थंडीत सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या भुकेच्या वेळेत बरेच लोक पौष्टीक लाडू खातात. या लाडूंच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात (Gond Ladoo). हे पौष्टीक लाडू काजू, बदाम, तूप, गूळ, डिंक यांसारख्या पदार्थांनी बनलेले असतात. तुम्ही या लाडूंमध्ये साखर न घालता गूळ किंवा खजूर घालून गोडवा निर्माण करू शकता. डिंकाचे लाडू अनेकांचे फेव्हरेट असतात. डिंकाचे लाडू खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. डिंकाच्या लाडूंची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Dink Laddu)
डिंकाच्या लाडूंसाठी लागणारं साहित्य
गव्हाचे पीठ- १ वाटी
खाण्याचा डिंक- ५० ग्रॅम
तूप- १/२ ते ३/४ वाटी
गूळ (चिरलेला)-१ ते १.५ वाटी
बारीक केलेले सुके खोबरे-१/२ वाटी
सुका मेवा (बदाम, काजू, पिस्ता) - १/२ वाटी (बारीक चिरलेले)
खसखस- २ मोठे चमचे
वेलची पूड- १ छोटा चमचा
डिंकाच्या लाडूंची सोपी रेसिपी
एका जाड बुडाच्या कढईत २-३ चमचे तूप गरम करा. तूप मध्यम गरम झाल्यावर त्यात थोडा-थोडा डिंक टाका आणि तो फुलून पांढरा होईपर्यंत तळून घ्या. डिंक कच्चा राहू नये. तळलेला डिंक एका ताटात काढून घ्या आणि थंड झाल्यावर हलकासा कुस्करून घ्या.
उरलेले तूप कढईत घाला. तूप गरम झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत (Golden Brown) व सुवास येईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले पीठ बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत सुके खोबरे हलके गुलाबी होईपर्यंत भाजा. सुका मेवा आणि खसखस मंद आचेवर हलके परतवून घ्या.
एका मोठ्या भांड्यात भाजलेले गव्हाचे पीठ, तळलेला डिंक, भाजलेले सुके खोबरे, सुका मेवा आणि खसखस एकत्र करा. आता कढईत गूळ आणि थोडेसे पाणी घालून त्याचा पाक तयार करा. गूळ विरघळल्यानंतर आणि त्यात थोडे बुडबुडे दिसू लागल्यास हे गरम गुळाचे मिश्रण लगेच पिठाच्या मिश्रणात घाला.
वेलची पूड घालून सर्व मिश्रण चमच्याने लवकरात लवकर मिक्स करा. मिश्रण कोमट असताना लगेच घट्ट लाडू वळून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळणे कठीण होते. हवाबंद डब्यात साठवा आणि पौष्टिक डिंक लाडूचा आनंद घ्या.
