आवडतं फास्ट फूड खाल्ल्यानंतर मूड चांगला होतो असं अनेकांना वाटतं. तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर थोडं थांबा. एका नवीन रिसर्चमध्ये फास्ट फूड आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडशी संबंधित असं सत्य समोर आलं आहे, जे समजल्यावर तुम्हाला धक्का बसेल. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, चीज बर्गर खाल्ल्याने तुमचं आयुष्य ९ मिनिटं कमी होऊ शकतं, तर कोल्ड्रिंक प्यायल्याने १२ मिनिटांनी कमी होऊ शकतं.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी जवळपास ५८०० खाद्यपदार्थांचं विश्लेषण केलं आणि त्यांच्या आरोग्यावरील खर्चाचं म्हणजेच आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मूल्यांकन केलं. या रिसर्चनुसार, असे अनेक पदार्थे आहेत जे खाल्ल्यानंतर आपण आपल्या आयुष्यातील काही मिनिटं गमावू शकतो. त्यासोबत कोल्ड्रिंक्सचंही सेवन केल्यास आणखी हानी होते.
शास्त्रज्ञांनी सांगितलं की, असे काही पदार्थ आहेत जे तुमचं आयुष्य वाढवू शकतात. पीनट बटर आणि जेली सँडविच खाल्ल्याने ३२ मिनिटांचा फायदे होतो. नट आणि बिया खाल्ल्याने आयुर्मान २४ मिनिटांनी आणि फळं खाल्ल्याने १० मिनिटांनी वाढू शकतं. याशिवाय मासे आणि भाज्या तुमचे आयुष्य वाढवण्यास मदत करतात.
फास्ट फूड आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमध्ये जास्त प्रमाणात साखर, अनहेल्दी फॅट आणि प्रिजर्व्हेटिव्ह असतात. चीज बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या गोष्टींमध्ये असे घटक असतात ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि लठ्ठपणासारखे आजार होऊ शकतात.
दररोज फळं आणि भाज्यांमधून दररोज १०% कॅलरी वाढवल्याने तुमच्या आयुष्यात ४८ मिनिटं वाढू शकतात. या रिसर्चचं नेतृत्व करणारे डॉ. ऑलिव्हियर जॉलिएट म्हणतात की, छोटे बदल करून मोठे फायदे मिळू शकतात. आपण आपल्या आहारात बदल करणं आवश्यक आहे, जेणेकरून केवळ आपलं आरोग्य सुधारत नाही तर पर्यावरणावर देखील सकारात्मक परिणाम होईल.