चहाचे विविध प्रकार असतात. सगळेच चवीला वेगळे असतात. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगळा प्रकार पितात. त्यापैकीच एक म्हणजे लिंबाचा चहा म्हणजेच ब्लॅक लेमन टी. हा प्रकार हलका आणि पोटाला आराम देणारा आहे. अनेकांना दुधाचा चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी, पोट फुगणे, जडपणा किंवा मळमळ जाणवते. अशा वेळी चहा पूर्णपणे टाळण्याऐवजी ब्लॅक लेमन टी हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो. दूध नसल्यामुळे हा चहा सहज पचतो आणि तरीही चहा प्यायल्याचं समाधान देतो. पित्ताचा त्रास आहे आणि चहाचा मोहही सोडवत नाही तर हा चहा मस्त पर्याय आहे.
ब्लॅक लेमन टी पिण्याचे काही फायदे आहेत. लिंबामधील नैसर्गिक आम्ल पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि अपचन, गॅस यांसारख्या तक्रारी कमी करते. गरम ब्लॅक लेमन टी प्यायल्याने तरतरी येते आणि थकवा कमी झाल्यासारखं वाटतं. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त ठरते, त्यामुळे बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्यापासून थोडा आराम मिळू शकतो. तसेच हा चहा शरीरातील जडपणा कमी करुन हलकेपणाची भावना देतो. पोट साफ करण्यातही मदत करतो.
लिंबाचा चहा चविष्ट करण्यासाठी काही साध्या टिप्स वापरता येतात. चहामध्ये आलं घातल्यास त्याला छान चव आणि सुगंध येतो आणि पचनासाठीही तो अधिक फायदेशीर ठरतो. तुळशीची पाने घातल्याने चहाचा सुगंध वाढतो आणि तुळशीचे औषधी गुणधर्म शरीराला मिळतात ते फार उपयुक्त ठरतात. लिंबाचा रस शेवटी घातल्यास चहा कडू न होता छान ताज्या चवीचा लागतो. गोडवा हवा असल्यास साखरेऐवजी थोडंसं मध घातल्यास चहा अधिक पौष्टिक आणि हलका होतो. काही जण चवीत वेगळेपणा आणण्यासाठी दालचिनी किंवा काळी मिरीची अगदी चिमूटभर पूडही घालतात. चहा पूड कमी वापरा. आणि पूड थोडी कमी उकळा.
दुधाचा चहा प्यायल्यावर जर वारंवार पोटाला त्रास होत असेल, पण चहा प्यायची सवय सुटत नसेल, तर दिवसातून एखादा कप ब्लॅक लेमन टी नक्कीच पिऊ शकता. हा चहा पोटावर ताण न देता शरीराला आराम देतो आणि मनालाही शांत करतो. एकूणच, ब्लॅक लेमन टी हा आरोग्यदायी, चविष्ट आणि दुधाच्या चहाला उत्तम पर्याय ठरतो.
