फोडणीची चपाती महाराष्ट्रात घरोघरी केली जाते. चवीला मस्त असते. उरलेली पोळी वाया जाऊ नये म्हणून जरी हा पदार्थ केला जात असला तरी आता तो सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. फोडणीची चपातीच नाही तर भाकरीही फार चविष्ट लागते. शिळी भाकरी कडक होते. (Breakfast Special: a spicy traditional breakfast! Phodnichi Bhakri, easy recipe must try )त्यामुळे नुसती खावीशी वाटत नाही. अशावेळी भाकरीचा असा चुरा करा. फार सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.
साहित्य
भाकरी, कांदा, लसूण, कोथिंबीर, कडीपत्ता, लिंबू, मीठ, पाणी, मोहरी, जिरं, तेल, लाल तिखट, हळद, शेंगदाणे, हिंग, हिरवी मिरची
कृती
१. भाकरीचा चुरा करण्यासाठी तीन पद्धती वापरु शकता. त्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती पद्धत करा. एकतर भाकरीचे बारीक तुकडे करायचे. हातानेच भाकरी चुरायची आणि वापरायची. दुसरी पद्धत म्हणजे जर बारीक आवडत असेल तर मग मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायची. अगदी त्याचा लगदा करु नका. फक्त बारीक करा. तिसरी पद्धत म्हणजे भाकरीचे तुकडे पाण्यात भिजवायचे आणि त्याचा कुसकरा करायचा. पाणी भाकरी ओली करण्यापुरतेच वापरायचे.
२. कांदा सोलायचा आणि बारीक चिरुन घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या आणि सोलून घ्यायच्या. तसेच कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची आणि बारीक चिरायची. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घालायचं. कडीपत्ता घालायचा आणि परतायचे. त्यात थोडे हिंग घालायचे.
३. फोडणीत लसणाच्या पाकळ्या घालायच्या. शेंगदाणे घालायचे आणि परतून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि शेवटी कांदा घालायचा. कांदा मस्त गुलाबी परतायचा. नंतर त्यात चमचाभर हळद, थोडे लाल तिखट घालायचे आणि परतायचे. शेवटी भाकरीचा चुरा घालायचा थोडे पाणी घालायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. फोडणी आणि चुरा एकजीव करायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर नंतर झाकण न ठेवता जरा कुरकुरीत परतायचा. वरतून लिंबू पिळायचा. गरमागरम खा. मस्त लागतो.