गोड न आवडणारे लोक मूठभर असतील, बाकी लोक आता तब्येतीच्या काळजीने गोड कमी खातात तोही भाग वेगळा. पण मनुष्याचा स्थायी भाव हा गोड खाऊच आहे! बघा ना, काही छान घडले की लगेच आपण म्हणतो, तोंड गोड कर...म्हणजे आवड कसली? तर गोड खाण्याची. अर्थात ते मर्यादेत खाल्ले तर काही त्रास होत नाही. अति तिथे माती होणारच. म्हणून रोज रोज गोड न खाता सणासुदीला मिष्टांन्नाचा स्वयंपाक अर्थात गोडधोडाचा नैवेद्य आपल्याकडे केला जातो. सण-उत्सव साजरा करण्याचं ते निमित्त आहे. पदार्थ मिट्ट गोड असूनही चालत नाही की कमी गोड असूनही चालत नाही. तो प्रमाणात गोड असला पाहिजे आणि प्रमाणातच खाल्ला पाहिजे. नमनाला एवढं घडाभर तेल पुरेसं आहे. आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया.
प्रत्येकाच्या घरात फ्रिजमध्ये ब्रेडच्या तीन चार स्लाईज उरलेल्या असतात. त्याचे काही करू या नादात त्या दुर्लक्षित होतात. यावर मस्त पर्याय दिला आहे क्रांती इंगळे यांनी. त्या लिहितात, उरलेल्या ब्रेडपासून फक्त १० मिनिटात घरीच करा स्वादिष्ट, मऊ गुलाबजाम. हे गुलाबजाम घरी केले आहेत की बाहेरून आणले आहेत हे कोणाच्या लक्षातही येणार नाही. पाहूया साहित्य आणि कृती -
ब्रेडचे गुलाबजाम रेसेपी :
साहित्य :
२ वाट्या साखर१ टीस्पून वेलचीपूड२ मोठे ग्लास पाणी८ ते १० ब्रेड स्लाईस१ कप दूध८ ते १० काजू तुकडेकेशर, तूप गुलाबजाम तळण्यासाठी
कृती :
१) सगळ्यात आधी साखरेचा पाक तयार करण्यसाठी एका भांड्यात साखर व पाणी एकत्र करून माध्यम आचेवर पाक करायला ठेवा. पाक व्हायला १० मिनिट लागतील.
२) पाक फार पातळ किंवा फार घट्ट असू नये. पाकाला थोडासा चिकटपणा येऊ द्यावा. नंतर त्यात वेलची पूड, केशर घालून एकदा ढवळून घ्या मग भांडं झाकून ठेवा.
३) गुलाबजाम करण्यासाठी आधी ब्रेडच्या चारी बाजूंनी कडा कापून बाजूला ठेवा. ब्रेडच्या कडा एका पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. तुम्हाला कटलेट किंवा पॅटिस बनवताना वापरता येतील.
४) एका बाउलमध्ये ब्रेडचे तुकडे करून त्याचा चुरा करून घ्या. मग त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपण जसे पीठ मळतो तसे मळा. पीठ फार घट्ट किंवा सैल मळू नका. मग झाकून ५ मिनिट बाजूला ठेवा.
५) मळलेल्या पीठाचे चांगले गोळे तयार करा. गोळा तयार झाल्यानंतर हवा असल्यास त्यात काजू घालून पुन्हा गोळा घट्ट बंद करा.
६) कढईमध्ये तूप गरम करून घ्या. मग गोळे छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. साखरेचा पाक केलेल्या भांड्यात तळलेले गुलाबजाम घालून झाकण ठेवून मंद विस्तवावर ५ मिनिट गरम करून घ्या.
७) थंड झाल्यावर बाउलमध्ये काढून घेऊन त्यावर आवडीनुसार बदाम, पिस्ता घाला. तयार आहेत स्वादिष्ट ब्रेड गुलामजाम.