उन्हाळ्यातली लग्नं असली की त्या लग्नाच्या पंगतीला काही पदार्थ आवर्जून असतातच. त्यापैकी काही पदार्थ म्हणजे आमरस, आम्रखंड, मठ्ठा आणि गारेगार ताकात केलेला बुंदी रायता. हे पदार्थ जेवणात असतील तर त्या पंगतीची मजा आणखीनच वाढत जाते. यापैकी बुंदी रायता हा असा एक पदार्थ आहे जो बिर्याणी, पुलाव, मसालेभात अशा पदार्थांसोबतही हमखास खाल्लाच जातो. पण बऱ्याचदा आपण जेव्हा तो घरी करायला जातो, तेव्हा त्याला म्हणावी तशी चव येत नाही. आता तर उन्हाळ्याच्या दिवसांत हमखास बुंदी रायता खावा वाटतो (Boondi Raita Recipe). म्हणूनच तो अगदी हलवाई स्टाईलने घरी कसा करायचा यासाठी काही खास टिप्स पाहा...(secret tips for making perfect boondi raita)
परफेक्ट बुंदी रायता करण्याची रेसिपी
बुंदी रायता घरी तयार करायचा असेल तर त्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे दही चांगलं फेटलं जाऊन ते योग्य प्रमाणातच पातळ झालं पाहिजे. खूप घट्ट किंवा अतिपातळ दह्याचा रायता चांगला लागत नाही. तसेच जास्त आंबट दह्याचं रायतंही चांगलं लागत नाही. त्यामुळे मुळातच खूप आंबट दही बुंदी रायता करण्यासाठी वापरू नये.
साधारणपणे १ किलो दह्याचा बुंदी रायता तुम्ही करत असाल तर त्यासाठी तुम्हाला १ मोठा चमचा एवढं काळं मीठ आणि १ ते २ टीस्पून हिंग लागणार आहे. यात तुम्ही थोडा चाट मसालाही घाला. कारण काळं मीठ आणि चाट मसाला हे दोन्हीही रायत्याला खूप चांगला फ्लेवर देतात.
रायता तयार करताना त्यात जिरेपूड घालणंही खूप गरजेचं आहे. जिरेपूड करण्यापुर्वी जिरे तव्यावर टाकून मंद आचेवर चांगले भाजून घ्या आणि मिक्सरमधून त्याची अगदी बारीक पावडर करा. जिरेपूड जेवढी बारीक असेल तेवढा रायत्याला चांगला सुगंध येतो.
यानंतर सगळ्यात शेवटी रायत्यामध्ये बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची घाला. थोडीशी मिरेपूडही घाला. रायता सर्व्ह करण्याच्या १५ मिनिटे आधी त्यात बुंदी घाला. अशावेळी बुंदी पाण्यात भिजवून घेण्याची गरज नाही.
