६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. या दिवशी उपासाला फराळात साबुदाणा खिचडीला उत्तम पर्याय म्हणजे राजगिरा आणि वरी तांदळाची खीर! ही खीर बनवायला तर सोपी आहेच, शिवाय पचायलाही हलकी आहे. वाटीभर खीर खाल्ली तरी पोट भरलेले राहते. आणखी काही खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये ती झटपट बनते. पुढे दिलेली रीत राजगिरा आणि वरी तांदळाची आहे, यात बदल करून तुम्ही फक्त राजगिरा वापरूनही खीर करू शकता. पण दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन खिरीला दाटपणा आणते. चला तर पाहूया राजगिरा खीर रेसेपी-
राजगिरा आणि वरी तांदळाची खीर
साहित्य : पाव कप राजगिरा, पाव वाटी वरी तांदूळ, साखर, दूध, वेलची पावडर, सुका मेवा
कृती :
- पाव वाटी राजगिरा आणि पाव वाटी भगर अर्थात वरी तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
- कुकरमध्ये चमचाभर तूप घालून त्यावर दोन्ही घटक परतून घ्यायचे.
- पाचपट पाणी घालून कुकरचे झाकण लावावे. तीन शिट्या काढाव्यात.
- दोन्ही गोष्टी व्यवस्थित शिजतात.
- शिटी उतरल्यावर कुकर उघडावा.
- पुन्हा गॅस सुरु करून त्यात दोन कप दूध घालावे.
- पाच मिनिटं एकजीव होऊ द्यावे.
- त्यात चवीनुसार साखर घालून २ मिनिटं उकळी येऊ द्यावी.
- चिमूटभर वेलची पूड आणि सुका मेवाघालावा.
- १० मिनिटात घट्ट, दाटसर, पौष्टिक खीर तयार होते.
- थंड झाल्यावर ही खीर आणखी घट्ट होते.
- राजगिरा पचायला हलका असल्याने खीर खाऊनही त्रास होत नाही आणि वाटीभर खीर खाल्ली तरी दीर्घकाळ पोट भरलेले राहते.