मेथी या भाजीचे अनेक पदार्थ करता येतात. मेथीची पोळी, पराठा, मुठके, भाजी, आमटी आदी अनेक पदार्थ केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे मेथीची वडी. करायला अगदी सोपी आहे. तसेच चवीलाही मस्त लागते. मेथीची वडी कडू किंवा जरा तुरट लागते असे जर वाटत असेल तर ही रेसिपी नक्की करुन पाहा. अजिबात कडू होत नाही उलट खमंग आणि कुरकुरीत होते. पाहा कशी करायची.
साहित्य
मेथी, बेसन, तांदूळाचे पीठ, पांढरे तीळ, तेल, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, जिरे, कडीपत्ता, हळद, लाल तिखट, मीठ, बेकींग सोडा
कृती
१. मेथी निवडायची आणि त्याची पाने काढून घ्यायची. मेथी छान चिरुन घ्यायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. एका पातेल्यात मेथी घ्यायची. नंतर त्यात वाटीभर बेसन आणि चार ते पाच चमचे तांदूळाचे पीठ या प्रमाणानुसार पीठ घ्यायचे. त्यात थोडे पाणी घालायचे. पातळ करु नका. जरा घट्टच राहू द्यायचे.
२. पीठ आणि मेथी छान एकजीव होऊ द्यायचे. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. थोडे जिरे घालायचे. मसाला वाटून घ्यायचा. तयार पिठात ओतायचा. छान ढवळून घ्यायचे आणि मग त्यात थोडे पांढरे तीळ घालायचे. थोडा कडीपत्ता घालायचा. थोडा बेकींग सोडा घालायचा आणि ढवळून घ्यायचे. बेकींग सोडा अगदी शेवटी घालावा. म्हणजे त्याचा फायदा होतो. आधीच घातला तर वाया जातो.
३. एका पातेल्याला तेल लावायचे. त्यात पांढरे तीळ घालायचे. तयार केलेले पीठ ओतायचे. एका कुकरमध्ये किंवा इडलीपात्रात वाफवून घ्यायचे. छान शिजल्यावर गार करायचे. गार झाल्यावर काढून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करायचे. सुरीने आरामात भाग करता येतात.
४. कढईत तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात तयार वड्या सोडून खमंग तळायच्या. कुरकुरीत होतात. आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत अशा मेथीच्या वड्या चवीला फार मस्त लागतात. एकदा नक्की करुन पाहा. सॉस किंवा आवडत्या चटणीसोबत पोटभर खा.
