आपल्या ग्रामीण भागात आजही तांदूळाची भाकरी हा पदार्थ जेवण, नाश्ता दोन्ही वेळी खाल्ला जातो. मात्र बरेचदा भाकरी करायची पद्धत जरा वेगळी असते. अनेक जण उकड काढून भाकरी करतात. उकड काढून भाकरी करण्याची परंपरा आजही टिकून आहे. ही भाकरी मऊसर, हलकी आणि चवीला अप्रतिम लागते. (A different way to make rice Bhakri, bhakri becomes softer and more nutritious)पूर्वी आजी-आई या उकडीच्या भाकऱ्या खास पाहुण्यांसाठी करत असत. कारण या भाकरीचा सुगंध आणि पोत अगदी खास असतो. आजच्या काळातही हा पारंपरिक प्रकार घराघरात लोकप्रिय आहे. कारण ती केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही उकडीची भाकरी कधी खाल्ली का?
तांदळाची उकड भाकरी करण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी उकळवायचे. पाण्यात थोडे मीठ आणि थोडे तेल घातले की भाकरी अजून छान होते. आता त्यात तांदूळाचे पीठ घालून झटपट ढवळायचे. त्यामुळे गुठळ्या तयार होणार नाहीत. काही वेळाने गॅस बंद करुन झाकण ठेवावे आणि उकड थोडी थंड झाल्यावर हाताने मऊसर मळावी. त्या उकडीचे गोळे करुन भाकऱ्या थापायला घ्या आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. थोडं तूप लावल्यावर भाकरीचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतो. अगदी सोपी पद्धत आहे. नक्की करुन पाहा. भाकरीची चव नक्कीच जरा वेगळी लागते.
उकड काढल्यामुळे पिठात नैसर्गिक ओलावा टिकतो आणि त्यामुळे भाकरी जास्त मऊ राहते. ही भाकरी दुसऱ्या दिवशीही कोरडी होत नाही. तांदळाचे पीठ हलके असल्याने पोटावर भार येत नाही आणि पचनही सुरळीत होते. ज्यांना गव्हाची किंवा ग्लूटेनची अॅलर्जी असते, त्यांच्यासाठी ही भाकरी एक उत्तम पर्याय ठरते.
भाजी, आमटी, दही किंवा लोणच्याबरोबर ही भाकरी अप्रतिम लागते. विशेषतः कांदा-लसूण घालून केलेल्या तिखट भाजीसोबत तिचा स्वाद जास्त छान लागतो. ग्रामीण भागात तांदळाच्या उकडीच्या भाकऱ्या रोजच्या जेवणाचा भाग असतात, कारण त्या पोटभरीच्या आणि पौष्टिक असतात. तांदळाची उकड काढून केलेली भाकरी म्हणजे आपल्या परंपरेचा स्वाद आणि आरोग्याची जपणूक दोन्ही. या भाकरीत साधेपणाचं सौंदर्य आहे, थोडं तांदळाचं पीठ, थोडं तूप आणि प्रेमाने मळलेली उकड. मऊ, रुचकर आणि आरोग्यदायी आहारात ही भाकरी नक्की असावी.
