भारतीय आहारात पोळी, चपाती अशा पदार्थांचा समावेश असतोच. भाजी, आमटी विविध प्रकारच्या असतात. मात्र पोळी असतेच. आहाराचा अविभाज्य भाग आहे. भाकरी किंवा पोळी हवीच. मात्र पोळीपेक्षा पौष्टिक पर्यायही आहे. तो म्हणजे फुलका. पोळी छान असतेच पण पोळीपेक्षा फुलके हे अधिक हलके, पचायला सोपे आणि तुलनेने पौष्टिक मानले जातात. फुलके करताना तेलाचा वापर जवळजवळ होतच नाही. (5 tips for making puffed phulka, phulka is more nutritious and softer than roti)त्यामुळे त्यात कॅलरी कमी असतात. शरीराला पोषण जास्त आणि कॅलरीज कमी मिळतात. शिवाय फुलका गॅसवर फुलवल्यामुळे त्याच्या आत हवा तयार होते, ज्यामुळे त्याची रचना मऊ, स्पंजी होते. पोळी मात्र तव्यावर पूर्ण भाजली जाते आणि बर्याचदा तव्यावर शेकताना थोडेसे तेल लागत असल्याने ती थोडी पचायला जड वाटू शकते. निरोगी आहाराच्या दृष्टीने फुलके हा हलका, कमी कॅलरीजचा आणि सहज पचणारा पर्याय ठरतो.
फुलका मऊ आणि छान फुललेला होण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पीठ मळणे हा त्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा. गव्हाचे पीठ हलक्या हाताने नीट मळून घ्यावे आणि त्यात हवे असल्यास चिमूटभर मीठ घालावे. मळलेले पीठ किमान १५–२० मिनिटे झाकून ठेवले तर त्यातील ग्लूटन सेट होते आणि फुलका मऊ होतो. पिठाच्या गोळ्या लहान आणि एकसमान आकाराच्या असाव्यात. लाटताना मध्यभाग पातळ आणि कडा किंचित जाड राहिल्या तर फुलण्याची फुलण्याची प्रक्रिया अधिक सहज होते.
तवा नेहमी मध्यम आचेवर गरम करावा. अतितापमानामुळे फुलका जळू शकतो, तर कमी तापमानावर तो फुलत नाही. फुलका तव्यावर टाकल्यावर तो तव्यावर उलटू नका. तव्यावर एकच बाजू परतायची. दुसरी बाजू गॅसवर भाजायची फुलका जाळीवर किंवा थेट गॅसवर भाजा. गॅसवरील उष्णतेमुळे त्याच्या आत हवा भरते आणि तो संपूर्ण फुलतो. भाजल्यानंतर फुलके लगेच मऊ कापडात गुंडाळून ठेवावेत, त्यामुळे त्यातील उष्णता टिकून राहते आणि फुलका जास्त वेळ मऊ राहतो. या साध्या, पण प्रभावी टिप्स पाळल्या तर रोजच्या स्वयंपाकात मऊ, पोषणमूल्यपूर्ण आणि परफेक्ट फुलके सहज तयार करता येतात. पोळीच्या तुलनेत अधिक हलके आणि आरोग्यदायी असल्यामुळे फुलका हा पदार्थ आहारात असायलाच हवा.
