Join us

मटारच्या सिझनमध्ये घरीच करुन ठेवा फ्रोजन मटार, दुकानातून महागडे मटार घेण्यापेक्षा ट्राय करा २ सोप्या पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2023 10:15 IST

2 Easy methods of doing frozen peas in winter season : थोडी मेहनत घेतली तर वाचू शकतात भरपूर पैसे...

थंडीच्या दिवसांत बाजारात मस्त हिरवेगार, गोड मटार मिळतात. एरवी दुप्पट ते तिप्पट किमतीला असणारे हे मटार थंडीच्या दिवसांत अतिशय स्वस्त मिळतात. मटार ही अनेकांच्या आवडीची भाजी तसेच पावभाजी, कटलेट, पुलाव अगदी पोहे आणि उपमा अशा वेगवेगळ्या पदार्थांत हे मटार वापरता येत असल्याने पदार्थांची चव वाढण्यास मदत होते. मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्याने आरोग्यासाठीही ते खाणे चांगले असते. आता थंडीचे २ ते ३ महिने आपण ताजे मटार आवर्जून खातो खरे पण एरवी मात्र आपल्याला फ्रिज केलेले मटार बाजारातून आणावे लागतात किंवा ताज्या मटार ऐवजी वाटाण्याचा वापर करावा लागतो. वाटाण्याला मटारची सर नसते आणि फ्रोजन मटार खूप महाग मिळतात. त्यापेक्षा थंडीच्या दिवसांत आपण घरीच जास्त प्रमाणात मटार आणून ते फ्रिजरमध्ये योग्य पद्धतीने साठवले तर आपल्याला पुढचे किमान ६ महिने ते वापरता येऊ शकतात. पण हे मटार साठवण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया (2 Easy methods of doing frozen peas in winter season)...

1. या पध्दतीमध्ये मटार पाण्यात न शिजवता किंवा उकडता साठवता येतात.वर्षभर मटारचे दाणे साठवण्यासाठी पेन्सिल मटार शेंगा आणाव्यात. यातील दाणे चवीला गोड आणि कोवळे असतात. एक किलो मटार दाणे असतील तर एक छोटा चमचा मोहरीचं तेल घ्यावं. तेल सर्व मटारच्या दाण्यांना नीट लावावं. मोहरीचं तेल लावल्यानं फ्रिजरमधे ठेवलेल्या मटारवर बर्फ साठत नाही. मोहरीचं तेल लावलेले दाणे प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात घालून आणि पिशवीचं तोंड रबर लावून बंद करावं. ही पिशवी फ्रिजरमध्ये ठेवून द्यावी आणि हवे तेव्हा हे मटार वापरावेत. 

(Image : Google)

2. घरी वर्षभर मटारचे ताजे दाणे साठवण्याची दुसरी पध्दत दाणे उकडून घेण्याची.यात आपल्याला जेवढे मटार दाणे साठवायचे आहेत तेवढ्या शेंगा घ्याव्यात. निवडलेले मटारचे दाणे पाण्याने दोनदा धुवावेत.नंतर एक मोठं भांडं घेऊन त्यात पाणी गरम करयला ठेवावं. पाण्याला उकळी आली की त्यात मटार दाणे घालावेत. हे दाणे पाण्यात 2 मिनिटं उकळावेत आणि नंतर गॅस बंद करावा. मटारचे दाणे एका चाळणीत काढून घ्यावेत.मग एका भांड्यात साधं पाणी घ्यावं आणि त्यात बर्फाचे तुकडे घालावेत.त्या पाण्यात गरम पाण्यातून काढलेले मटार दाणे घालावेत. मटारचे दाणे पूर्ण थंड झाले की पुन्हा ते पाण्यातून निथळून घ्यावेत.एक मोठ्या सुती कापडावर हे दाणे पसरुन ठेवावेत. दाण्यातील पाणी पूर्ण सुकलं की एका प्लास्टिकच्या पिशवीत हे दाणे ठेवावेत.पिशवीचं तोंड बंद करावं आणि ही पिशवी फ्रिजरमधे ठेवून द्यावी.

 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीभाज्याकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स