उन्हाळा सुरू झाला की उष्णता वाढणे, पित्ताचा त्रास होणे किंवा अॅसिडिटी वाढणे अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. अशा वेळी नैसर्गिक थंडावा देणारे काही पदार्थ आहारात असतील तर शरीरासाठी फायद्याचे ठरते. सब्जा हा त्यापैकीच एक छोटासा पण अत्यंत गुणकारी घटक आहे. काळ्या रंगाच्या या लहान बिया पाण्यात भिजवल्यावर फुलून जेलीसरख्या दिसतात आणि शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करतात.
आयुर्वेदात त्यांचा वापर पूर्वीपासून केला जातो. सब्जामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे किंवा पोट फुगणे अशा समस्या कमी करण्यासाठी सब्जा उपयोगी ठरु शकतो. फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही तो सहाय्यक ठरतो. अति भूक नियंत्रणात राहते.
उन्हाळ्यात अंगातील उष्णता वाढल्याने अॅसिडिटी, जळजळ किंवा पित्ताचा त्रास वाढतो. अशा वेळी भिजवलेला सब्जा शरीराला नैसर्गिक थंडावा देतो. त्यातील अँटी ऑक्सिडंट्स आणि काही खनिज घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात. रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठीही फायबरचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तो संतुलित आहाराचा एक चांगला भाग ठरतो.
सब्जा खाण्याची पद्धतही सोपी आहे, मात्र तो नेहमी आधी पाण्यात भिजवणे अत्यावश्यक असते. साधारण दहा ते पंधरा मिनिटांत बिया फुलतात. त्या गुलाबाच्या सरबतात, लिंबूपाण्यात किंवा साध्या थंड पाण्यात घालून प्यायल्या तरी पोटासाठई चांगल्याच. लिंबू, मध आणि भिजवलेला सब्जा एकत्र करून तयार केलेले पेय सकाळी घेतल्यास ताजेतवाने वाटते. दूध, फालुदा, स्मूदी किंवा दह्यामध्येही सब्जा मिसळता येतो. त्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढते.
सब्जा खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तो कधीही कोरडा किंवा न भिजवता खाऊ नये, कारण त्याचा फायदाही होणार नाही आणि घशाला त्रासही होतो. अतिप्रमाणात सेवन केल्यास जास्त फायबरमुळे पोट बिघडू शकते किंवा जुलाब होऊ शकतात. लहान मुलांना देताना प्रमाण कमी ठेवावे. तसेच एखादा गंभीर आजार असेल किंवा नियमित औषधे सुरु असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. एकूणच, सब्जा हा साधा दिसणारा पण गुणांनी समृद्ध असा पदार्थ आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास तो उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो.
