वजन कमी करताना सुरुवात छान होते, पण रिझल्ट दिसले नाही की सगळा उत्साह मावळतो आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी गत होते. त्यामुळे सगळे जण अशा शोधात असतात, ज्यामुळे वजन कमी होईल आणि शरीरावर सकारात्मक बदलही दिसू लागतील. आज आपण अशीच एक सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.
वजन वाढीचा क्रम :
वजन वाढताना ते खालून वर नाही तर वरून खाली अशा रीतीने वाढते. आधी गाल वर येतात, मग बाह्या घट्ट होतात, नंतर पोट वाढतं आणि पाहता पाहता शरीर गोलाकार होऊ लागते. लोकांचा हा गैरसमज आहे की शरीराचा अमुक एक भाग वाढतो आणि व्यायामाने तो विशिष्ट भाग कमी करता येतो. तसे होत नाही, तर डाएट आणि व्यायाम सुरु केला, की आधी गाल उतरतात, बाह्या सैल होतात, पोटाचा घेर कमी होतो आणि मग टप्प्या टप्प्याने शरीर सुडौल होते. पाहणारे लोकही चेहरा बराच उतरलेला वाटतोय, अशीच कॉमेंट करतात. हा क्रम लक्षात ठेवा आणि व्यायामासाठी सज्ज व्हा. फार नाही, पण एखादी व्यायाम पद्धत, पण ती रोज, न चुकता केली तर त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतील.
वेट लॉस कशाने ? व्यायाम की डाएट :
लोकांना वाटते, डाएट केले की भागते, व्यायामाची गरज नाही. हा समजही चुकीचा आहे. वजन कमी करायचे असेल तर योग्य डाएट आणि व्यायाम या दोन्हीची गरज लागते. त्यात डाएटचा भाग ८० टक्के हवा आणि व्यायामाचा २० टक्के! आकडेवारी पाहून २० टक्के म्हणजे नगण्य समजू नका. कारण त्याशिवाय वेट लॉस जर्नी १०० टक्के पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवा. अगदी जिम मध्ये २ तास घाम गाळण्याची गरज नाही. पण शरीराला योग्य हालचाल हवी, व्यायाम करून घाम गाळायला हवा, तरच हाडांना मजबुती मिळेल, रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि हृदय ठणठणीत राहील. अन्यथा नुसत्या डाएट मुळे वजन कमी होईल पण चरबी लोम्बकळत राहील, जे अजिबात छान दिसणार नाही. म्हणूनच डाएटला व्यायामाची जोड द्या.
व्यायामाची सोपी पद्धत :
ज्यांना फार शारीरिक कष्ट आवडत नाहीत, त्यांनी ८० टक्के डाएट बरोबर २० मिनिटं चालण्याचा, १०-१५ मिनिटे झुंबा करण्याचा, १० मिनिटे दोरीच्या उड्या मारण्याचा, फुल रॅकेट किंवा तत्सम खेळ खेळण्याचा सराव केला पाहिजे आणि तेवढाही वेळ नसेल तर पुढे दिलेली कसरत सकाळी पाच मिनिटे आणि संध्याकाळी पाच मिनिटे केली तरी १५ दिवसांत बदल दिसू लागेल असे म्हटले आहे. तो व्यायाम कसा करायचा ते पाहू.
त्यासाठी मार्जरासन करतो तसे हात आणि पाय जमिनीला टेकून मांजरीसारखे बसावे आणि एकदा बालासन आणि नंतर भुजंगासन असे एकामागोमाग एक करावे. बालसनात हात डोक्याच्या दिशेने आणि डोकं जमिनीला टेकवावे आणि नंतर भुजंगासनात तसेच वर येऊन पोटावर, मांडीवर ताण येईल या पद्धतीने पाय मागे वरच्या दिशेला ताणावेत.
वेट लॉस जर्नीतील महत्त्वाचा मुद्दा :
सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटले जाते, त्याच पद्धतीने हा व्यायामसुद्धा सर्वांगाला व्यायाम देतो. त्यात तुमच्या श्वसन क्रियेचा सराव होतो, मानेवर, हातावर, छातीवर, पोटावर, ओटीपोटावर, मांड्यांवर, पोटऱ्यांवर ताण येतो. सदर व्हिडीओमध्ये हा व्यायाम सकाळी १०० वेळा आणि संध्याकाळी १०० वेळा केल्याने १५ दिवसांत फरक दिसू लागेल असे म्हटले आहे. सुरुवात १०-२०-३० ने केली, तरी हळू हळू सराव होत १०० चा आकडा गाठता येईल हे नक्की! त्यामुळे आजच हा व्यायाम प्रकार सुरु करा आणि आपल्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी सज्ज व्हा!
...आणि लक्षात घ्या, वजन जसे एका रात्रीत वाढत नाही तसे ते एका रात्रीत कमी देखील होत नाही. अघोरी वेट लॉस पद्धती करून वजन कमी करणे जीवावर बेतू शकते. म्हणून उगीच घाई गडबड न करता मनाशी निश्चय करून डाएट आणि व्यायामाला सुरूवात केली तर बघता बघता वजन नियंत्रणात येईल आणि चारचौघांकडून विचारणाही होईल!