वैद्य राजश्री कुलकर्णी (आयुर्वेद तज्ज्ञ)
व्रतवैकल्ये आणि सणवार सुरू झाले की, महिलांची एकच धांदल उडते. गृहिणी असोत किंवा नोकरदार सणवार, उपवास, व्रत अनेकजणी हौसेने करतात. परंपरेने, रीती सांभाळत करतात. उत्साह असतो आणि सगळं छान करण्याची इच्छाही. सणासुदीच्या काळात घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद हवा, चार चांगले पदार्थ करू असंही वाटतं. व्रतवैकल्ये, सणवार हे मुळात यासाठीच तर असतात. पण, या साऱ्यात आहाराची चूक झाली, स्वत:कडे नीट लक्ष दिलं नाही तर आहार आनंद, समाधान आणि उर्जा याऐवजी आरोग्याच्या तक्रारी वाट्याला येतात. वर्षातून एकदाच तर येतात सणवार म्हणून ज्या गोष्टी उत्साहाने करण्यासाठी महिला जीव काढतात, त्याच गोष्टींचा आनंद घेण्यात स्वत: मात्र अनेकदा कमी पडतात.
नेमकं काय चुकतं?
या गोष्टीचा विचार केला तर लक्षात येतं की, कामाचा ताण वाढतो तसं चुकीचा आहार काहीजणी घेतात.स्वत:च स्वत:ला गृहीत धरणं, स्वत:कडे अक्षम्य दुर्लक्ष करणं, या गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात.व्रतवैकल्ये असूद्या किंवा सण-उत्सव... स्वत:चा आहार जपणं, योग्य आहार घेणं, स्वत:च्या आरोग्याकडे डोळसपणे बघणं, आपल्या प्रकृतीला काय झेपतं, याकडे डोळसपणे बघणं आवश्यक आहे, हे सारं नीट प्रेमानं समजून घेतलं आणि काही गोष्टी बदलल्या, तर सर्वांसह आपणही आनंदी होऊ शकतो. जे करू त्यातून आनंद आणि समाधान लाभू शकतं.
काय करायला हवं?
१. श्रावण - भाद्रपदाचा काळ म्हणजे पोटाला विश्रांती देण्याचा काळ. कारण बाहेरचं वातावरण तसं असतं. त्यासाठी आपण स्वत: आपल्या पचनाला सहाय्य करण्याची गरज असते. उपवासाचा हेतू हा हलकं अन्न खाऊन पोटाला विश्रांती देणे, आपल्या पचनाला आपणच हातभार लावणे, हा असायला हवा. उलट हल्ली सोशल मीडियामुळे उपवासाच्या असंख्य पदार्थांच्या रेसिपी आपल्याला सतत दिसतात. उपवासाला एक ना अनेक पदार्थ करून उपवासाच्या थाळ्या सजवल्या जातात. अर्थात जे पदार्थ थाळी सजवून फोटो काढून पोस्ट करण्यासाठी केले जातात ते पदार्थ खाल्लेही जातात. अशा प्रकारची 'उपवासाची थाळी' म्हणजे पोटाला शिक्षाच. उपवासाला प्रामुख्याने भर्जित अन्न खावं. म्हणजे भाजलेले पदार्थ खावेत, राजगिऱ्याच्या लाह्या खाव्यात.
२. फळंसुध्दा कच्ची असल्याने इतर अन्नाच्या तुलनेत पचायला जड असतात. पण, एकावेळी फळ किंवा काहीतरी हलकं खावं. उपवासाचे भरपूर पदार्थ खाऊन फळे खाऊ नयेत. राजगिरा, थोड्या प्रमाणात भगर, खजुराच्या बिया, एखादं फळ हे पदार्थ उपवासासाठी योग्य आहेत. या पदार्थांनी पोट भरतं, उर्जा मिळते.
सणासुदीला मॅचिंग ब्लाऊजची पंचाईत होते? फक्त ४ रंगाचे ब्लाऊज शिवा, सगळ्या साड्यांवर सूट होतील ३. शेंगदाण्याचे पदार्थ जास्त खाणे किंवा एकदम उपाशी राहून उपवास करणे, यामुळे उपवासाच्या दुसऱ्या दिवशी पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्त प्रकोपाचा खूप त्रास होतो. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी साबुदाण्यासारखे लवकर न पचणारे पदार्थ खाल्ले तर पोटात गॅस होणे, दिवसभर अस्वस्थ वाटणे, उपवासानंतरचे पुढचे दोन-तीन दिवस मलावष्टंभ होणे, पोट दुखणे हे त्रास होतात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची पचनशक्ती मुळातच कमजोर असते. त्यांनी उपवासाच्या काळात पचायला जड पदार्थ खाल्ले तर पुढचे दोन-तीन दिवस त्यांना नीट भूकच लागत नाही. त्यामुळे सर्व प्रकृतींच्या व्यक्तींसाठी व्रतवैकल्याचा काळ हा आव्हानात्मकच असतो. हे आव्हान योग्य आहाराने पेलता येतं. स्वत:ची प्रकृती सांभाळून, कोणते पदार्थ चालतात, काय खाल्लं की आपल्याला त्रास होतो, हे सर्व ओळखून आहार घ्यायला हवा. तरच पचनशक्तीला आराम देण्याचा हेतू उपवासाने साध्य होतो.
४. अनेक महिला, पुरुष वजन कमी करण्यासाठी म्हणूनही उपवास करतात. उपवासाच्या काळात त्यांना आपलं वजन कमी झाल्यासारखं वाटतंही. पण ते पुन्हा वाढायला लागतं. एकदा उपवास करून वजन कायमस्वरुपी नियंत्रित ठेवता येत नाही. वजन कमी करण्यासाठी आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी सातत्य लागतं. ठराविक वेळेत मर्यादित खाणं, हे पथ्य उपवासालाच नव्हे तर एरव्ही पाळलं तरी ते फायद्याचेच ठरते.
आईबाबांनी नकळत केलेल्या २ गोष्टी मुलांचा आत्मविश्वास कमी करतात, मुलं होतात कुढी-अबोल-बुजरी५. उपवासाला चुकीचा आहार जेवढा त्रासदायक असतो तितकाच सणावाराला स्वत:कडे दुर्लक्ष करून धावपळ करण्याची सवयही महिलांच्या आरोग्यासाठी घातक असते. या काळात बायका तासनतास स्वयंपाकघरात राबूनही स्वत: मात्र उपाशी राहतात. नियमित व्यायाम करणाऱ्या महिलाही आज काय अमूक सण, उद्या काय तमूक आवराआवर अशा अनेक कारणांनी व्यायाम वगैरे सगळं गुंडाळून बाजूला ठेवतात. वेळ नाही, धावपळ होईल म्हणून रात्री जागून पदार्थ करणे, डेकोरेशन करणे, यामुळे तो क्षण साजरा होतो. मात्र, सणावारानंतर बायका आजारी पडतात. सण-वार स्वत:चं आरोग्य सांभाळून साजरे करण्याची सवय बायकांनी स्वत:ला लावून घेणं गरजेचं आहे.
६. एकमेकांना भेटणं, सोबतीनं आनंद साजरा करणं, हा सणवाराचा हेतू. सणावाराला अनावश्यक धावपळ करून, चुकीचा आहार घेऊन, उपाशी राहून, औषधं विसरून, व्यायाम टाळून... कसं चालेल? स्वत:ची काळजी घ्या आणि मग आनंदानं जमेल तेवढं नीट करा.
एक केसर चाय की प्याली हो! रिमझिम पावसात प्या केशर चहा, मन आनंदी करणारी स्पेशल चहा रेसिपी७. सणावाराला बायका पाळी पुढे ढकलण्याची गोळी घेण्याची मोठी चूक करतात. देवाचं करण्यात अडथळा नको म्हणून सरळ गोळी घेऊन पाळी पुढे ढकलण्यात बायकांना कसलाच धोका वाटत नाही. अशी औषधं घेऊन पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्याने आपल्या हार्मोन्सवर गंभीर परिणाम होतोय याचं भान राहात नाही. पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेऊ नयेत किंवा लवकर यावी म्हणून सोशल मीडियात पाहून भयंकर प्रयोगही स्वत:वर करू नयेत.८. सणवार असो, व्रतवैकल्ये असोत की, एरव्हीचा कोणताही दिवस माझ्यासाठी योग्य काय, याचा विचार प्रत्येकीनं कायम केला पाहिजे. आनंद मिळवण्याचा हेतू कधीच कोणाच्या आयुष्यातून हरवणार नाही. उलट जास्त आनंदाने आपण घरातल्या साऱ्यांसोबत सण, उत्सव साजरे करू शकू.