Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fitness Tips: व्यायामाला वेळ नाही, इच्छा नाही, तरीही फिट राहायचंय? मग 'या' ४ ट्रिक्स तुमच्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:56 IST

Fitness Tips: व्यायाम करायला हवा, हे कळते पण वळत नाही किंवा आळस येतो, अशांसाठी मोटिव्हेशनल ठरतील पुढील ४ ट्रिक्स; कशा ते जाणून घ्या. 

आपल्याला व्यायाम सुरू करायचा असतो, फिट राहायचे असते, पण दररोज तोच उत्साह टिकवून ठेवणे कठीण जाते. कधी कंटाळा येतो, तर कधी वेळेचे कारण पुढे येते. मात्र, व्यायामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला, तर आपण अजिबात इच्छा नसतानाही स्वतःला व्यायामासाठी तयार करू शकतो.

व्यायाम सुरू करण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स:

१. तासभर नको, निदान १५ मिनिटांची हालचाल करा 

अनेकांना वाटते की जर मी १ तास व्यायाम केला नाही, तर तो व्यायामच नाही. पण हा विचार चुकीचा आहे. जर तुमच्याकडे १ तास नसेल, तर फक्त १५-२० मिनिटे चाला किंवा मुलांसोबत डान्स करा. 'परफेक्ट' करण्याच्या नादात आपण अजिबातच काही करत नाही. त्यामुळे जेवढा वेळ मिळेल, तेवढा हालचाल करण्यावर भर द्या.

२. व्यायामाला वजनाशी जोडू नका

बहुतेक लोक फक्त वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात. पण जेव्हा वजन काट्यावरचा आकडा बदलत नाही, तेव्हा त्यांचा उत्साह मावळतो आणि ते व्यायाम सोडतात. त्याऐवजी, व्यायामाचे इतर फायदे पहा:

मानसिक शांतता: व्यायामामुळे तणाव कमी होतो.

ऊर्जा: दिवसभर फ्रेश राहण्यासाठी व्यायामाची मदत होते.

आरोग्य: स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. वजन कमी होणे हे उप-उत्पादन (By-product) आहे, पण मुख्य ध्येय 'आरोग्य' असावे.

३. तुम्हाला आवडेल तोच व्यायाम निवडा

दुसऱ्या कोणाला तरी जिम आवडते म्हणून तुम्हीही तिथेच गेले पाहिजे असे नाही. जर तुम्हाला जिममधल्या मशीन्सचा कंटाळा येत असेल, तर पोहायला जा, सायकलिंग करा, निसर्गात फिरायला जा, बॅडमिंटन किंवा कोणताही खेळ खेळा, झुंबा, गरबा डान्स स्टेप्स करा; जेव्हा आपण आपल्याला आवडणारी गोष्ट करतो, तेव्हा ती 'शिक्षा' न वाटता 'आनंद' वाटते.

४. व्यायामाचे कारण शोधा 

तुम्हाला व्यायाम का करायचा आहे? फक्त कोणाच्या तरी सांगण्यावरून की स्वतःला १० वर्षांनंतर फिट पाहण्यासाठी? जेव्हा तुमचे ध्येय स्पष्ट असते (उदा. मुलांसोबत खेळताना दम न लागणे, थकवा दूर करणे), तेव्हा तुमची इच्छा नसली तरी तुमचे मन तुम्हाला व्यायामासाठी प्रवृत्त करते.

चला तर मग, व्यायामाला वेळ नाही किंवा इच्छा नाही अशी सबब न देता तुमच्या फिटनेसचा मार्ग तुम्हीच शोधून काढा. 

English
हिंदी सारांश
Web Title : No Time, No Will? 4 Tricks to Stay Fit!

Web Summary : Short workouts, focusing on health benefits beyond weight loss, choosing enjoyable activities, and defining clear fitness goals are key to staying fit despite time constraints or lack of motivation.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स