Lokmat Sakhi >Beauty > सुंदर होण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? ॲण्टी एजिंग पिल्स घेणार की गोरं होण्याचं इंजेक्शन..?

सुंदर होण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? ॲण्टी एजिंग पिल्स घेणार की गोरं होण्याचं इंजेक्शन..?

आपण सुंदर आहोत, जसे आहोत तसे छान आहोत असं स्वत:ला स्वीकारलं तर जग जिंकता येतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 18:59 IST2025-07-08T18:57:07+5:302025-07-08T18:59:10+5:30

आपण सुंदर आहोत, जसे आहोत तसे छान आहोत असं स्वत:ला स्वीकारलं तर जग जिंकता येतं.

What can you do to become beautiful? Should you take anti-aging pills or get injections to make you look white? | सुंदर होण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? ॲण्टी एजिंग पिल्स घेणार की गोरं होण्याचं इंजेक्शन..?

सुंदर होण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? ॲण्टी एजिंग पिल्स घेणार की गोरं होण्याचं इंजेक्शन..?

Highlightsप्रेमानं स्वीकार हाच महत्त्वाचा भाग. त्या दिवशी आपण स्वत:ला सगळ्यात सुंदर दिसू लागतो.

सायली कुलकर्णी (मानसशास्त्रज्ञ)
“तुझं नाक छान आहे ग; पण, थोडं सरळ असतं तर...” “गोऱ्या त्वचेमुळेच तिला जास्त पसंती मिळते.” “तू थोडं वजन कमी केलंस तर खूप छान दिसशील!”
- ही आणि अशी वाक्यं आपल्यापैकी कुणालाही सतत येता इवपजाता ऐकायला मिळतात. टिपण्या-टोमणे-शेरे यामुळे नकळत आपल्या मनात एक भावना रुजते “मी सुंदर नाही, माझं शरीर समाजाच्या सुंदरतेच्या चाकोरीत बसत नाही!” हीच भावना हळूहळू आपल्याला स्वतःपासून तोडते आणि आपण स्वत:ला नाकारू लागतो. बदलू पाहतो.
त्यात आपल्या अवतीभोवती सौंदर्याची एक मोठी बाजारपेठ आहे. गोरं करणाऱ्या क्रीम आणि चेहरा सुंदर करणाऱ्या साबणाच्या जाहिराती काही नवीन नाहीत. पण, आता अँटी एजिंग ट्रीटमेंट्स, गोरं होण्यासाठीची इंजेक्शन्स, वजन कमी करणाऱ्या गोळ्या, फेस शेपिंग थेरपी, फिल्टर लूक्स हे सारं सर्रास सहज उपलब्ध आहे. या सगळ्याचा एकच अघोषित संदेश आहे “तू पुरेसा/पुरेशी नाहीस!”


त्यात मुलींना तर लहानपणापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सांगितलंच जातं की, सुंदर असणं म्हणजे गोरं, सडपातळ, रेखीव चेहरा, काळेभोर लांब केस. या साच्यात ज्या बसत नाहीत त्यांना सुंदर मानलं जात नाही आणि सतत ते ऐकवलंही जातं. रंग काळा तर लग्न कसं होणार म्हणून मुलींना वाट्टेल ते ऐकावं लागतं.
त्यामुळेच आपली ‘स्व प्रतिमा’ ही सौंदर्याच्या साच्यांमध्ये अडकत जाते.
स्व प्रतिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ते आपले शरीर स्व प्रतिमा /body image.
शरीर स्व प्रतिमा म्हणजे आपण स्वतःच्या शरीराकडे कसे पाहतो, सकारात्मकतेने की नकारात्मकतेने?
बरेचदा शरीर स्व प्रतिमेबाबतची नकारात्मकता अस्वस्थतेच्या स्वरूपात इतकी वाढते की, बॉडी डिसमॉरफिक डिसऑर्डरसारखी (BDD) मानसिक स्थिती बनते.
या त्रासात व्यक्तीला (स्त्री-पुरुष-तृतीयपंथी) आपल्या चेहऱ्यात, त्वचेत, नाकात, वजनात काहीतरी गंभीर दोष आहे असं वाटू लागतं.
या मानसिक स्थितीतील व्यक्ती आपल्या शरीराला सतत दोष देते. स्वत:ला सतत आरशात बघते किंवा बघणंच टाळते, लोकांना टाळते.
हळूहळू ही चिंता आत्मगंड, न्यूनगंड, नैराश्य आणि सामाजिक अलगतेत बदलते.

 

मनावर सौंदर्याचं ओझं!

१. Body Dysmorphic Disorder ही केवळ ‘दिसणं, न आवडणं’ इतकी सोपी भावना नसते, तर ती आपल्या मनात खोल रुजलेली असते. अनेक वेळा लहानपणापासून मिळालेल्या सौंदर्यविषयक टिपण्या “तुझं नाक चपटं आहे”, “तुझा रंग काळा आहे”, “तू बुटकी आहेस” अशा बोलक्या वाक्यांमधून नकळत आत्मगंड रुजतो.
२. मित्र-मैत्रिणी, पालक, शिक्षक, किंवा नातेवाइकांनी जरी सहजपणे टीका केली तरी त्या शब्दांचा ठसा मनावर खोल जातो. त्यातच आज समाजात सौंदर्याचे साचेबद्ध मापदंड आहेत. गोरेपणा, सडपातळपणा, ग्लो करणारी त्वचा; आणि सोबत सोशल मीडिया, त्यात आपण सुंदर दिसत नाही हा न्यूनगंड वाढतो.
३. आज इन्स्टाग्रामवर प्रत्येक चेहरा परिपूर्ण दिसतो. परंतु तो ‘फिल्टर’ असतो. Before-after व्हिडीओ, No Makeup Look ही सगळी फसवणूकच असते. पण, तरी इतरांचे देखणे फोटो पाहून अनेक जण स्वतःला दोषी समजतात. कमी लेखतात आणि स्वतःवर नाराज असतात.
४. त्या आभासी प्रतिमांशी स्वतःची तुलना करीत एक अंतर्गत मत तयार होते. ते म्हणजे “मी सुंदर नाही!” त्यातून BDD सारखा मनाचा आजार घेरायला लागतो.

 

स्वत:ला स्वीकारायचं कसं?

* आरशात बघताना दोष शोधू नका. माझं शरीर माझ्यासोबत आहे, ही भावनाच मोठी कृतज्ञतेची आहे.
* मी गोरी नाही, त्यामुळे सुंदर नाही, उंच नाही, वजन जास्त म्हणजे सुंदर नाही, असं वाटत असेल तर ते मनातून पुसून टाका. कारण यापैकी कशातच तुमचं सौंदर्य नाही.
* दिसणं ही एक बाजू, संवेदनशील मन, विचार, हसणं, कलागुण, बोलणं हे सारं सौंदर्याचाच भाग आहे.
* सोशल मीडियावर लोकांचे फोटो पाहून तुलना करणं थांबवा. सोशल मीडियावर दाखवली जाणारी कुणाचीही प्रतिमा सपशेल खोटी असते.
* लोक काय म्हणतात यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो यालाच अधिक महत्त्व द्या.
* वजन, त्वचेचा रंग, गुण हे आत्ममूल्याचे मोजमाप नाहीत.
* दिसणं सुधारण्यासाठी केलेली प्रत्येक कृती आत्मप्रेमातून आहे की न्यूनगंडातून आहे हे स्वतःला विचारा.
* स्वतःबद्दल प्रेमाने बोला. त्याची नोंद ठेवा. स्वत:चा प्रेमानं स्वीकार करा.
* स्वतःचा आवाज सोशल मीडियाच्या गोंगाटापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, तो ऐका.
* मी माझ्या नजरेतून जग पाहणार आणि तसंच आनंदाने जगणार, वागणार असं स्वत:लाही सांगा.
* आपल्या सभोवतालचं सौंदर्यदृष्टीचं परिमाण बदलण्यासाठी सुरुवात करा.. विविधता स्वीकारा, विविध सौंदर्याला दाद द्या.
* मनात सतत नकारात्मक विचार येत असतील, तर ते लिहून काढा; आणि हे इतकं महत्त्वाचं आहे का विचारा स्वत:ला..
* जर शरीराचा तिरस्कार वाटत असेल, तर याच आपल्या शरीराने तुम्हाला दिलेले अनुभव आठवा. चालणं, प्रेम करणं, स्पर्श करणं, आनंद घेणं.. त्याचा सन्मान करा.
* शरीर प्रतिमेबाबतचा न्यूनगंड कमी करण्यासाठी गरज असल्यास समुपदेशकाची नक्की मदत घ्या.
* त्या दिवशी शरीराबरोबर असलेली ही सततची लढाई संपते. त्या दिवशी आपण स्वत:ला सगळ्यात सुंदर दिसू लागतो. प्रेमानं स्वीकार हाच महत्त्वाचा भाग.

 

Web Title: What can you do to become beautiful? Should you take anti-aging pills or get injections to make you look white?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.