श्रीखंड हा सगळ्यांच्या आवडीचा गोडाचा पदार्थ आहे. मात्र कधी गुलाबाचे श्रीखंड खाल्लेत का ? चवीला अगदी वेगळे लागते. तसेच फार सोपेही आहे. (Rose Shrikhanda Recipe: Delicious pink colored Rose Shrikhanda and Puri best combination ever, see the recipe)घरीच करा आणि पोटभर खा. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य 
दही, पिठीसाखर, गुलाब सिरप, गुलाब पाणी, गुलाबाच्या पाकळ्या, वेलची पूड, काजू, बदाम, पिस्ता 
कृती
१. सर्वप्रथम ताजं आणि घट्ट दही घ्यायचे. दही स्वच्छ आणि जरा पातळ कॉटनच्या कपड्यात ओतून ते घट्ट बांधून घ्यायचे. नंतर तो कपडा एखाद्या भांड्याच्या वर लटकवून ठेवायचा जेणेकरुन दह्यातील पाणी खाली निघून जाईल. साधारणपणे ४ ते ५ तासांनी दही घट्ट आणि मलाईदार होईल. तयार चक्का म्हणजे श्रीखंडाचा मुख्य भाग असतो. त्यामुळे काळजीपूर्वक तयार करा. 
२. घट्ट झालेले हे दही एका मोठ्या भांड्यात घ्या आणि चमच्याने किंवा व्हिस्करने छान फेटा. मिश्रण अगदी मऊ, मुलायम आणि गुठळ्या नसलेले झाले पाहिजे. फेटताना काळजी घ्या की दही व्यवस्थित फेटले जाईल म्हणजे श्रीखंड मस्त होईल.
३. जरा फेटून झाल्यावर त्यात पिठीसाखर घालून नीट मिसळा. पिठीसाखर वापरल्याने ती पटकन विरघळते आणि श्रीखंडात एकसंध गोडवा येतो. मिश्रण हलके गोडसर आणि एकजीव होईपर्यंत फेटत रहायचे. साखर दह्यात मिक्स झाल्यावर श्रिखंड दिसायला अगदी विकतसारखे होईल.
४. साखर विरघळल्यानंतर त्यात गुलाब सिरप आणि गुलाब पाणी घाला. गुलाब सिरपमुळे श्रीखंडाला सुंदर गुलाबी रंग आणि गोड सुवास येतो, तर गुलाब पाण्याने त्याला सुगंध आणि गुलाबाची चव येते. सर्व घटक नीट एकत्र होईपर्यंत ढवळा. जेणेकरुन प्रत्येक घासात गुलाबाची गोड चव लागेल.
५. आता त्यात थोडीशी वेलची पूड घाला आणि हलक्या हाताने मिसळा. वेलचीचा सुगंध गुलाबाच्या सुवासाशी मिसळून अप्रतिम चव देतो. तयार झालेले हे श्रीखंड झाकून फ्रीजमध्ये १ ते २ तास ठेवा. थंड झाल्यावर श्रीखंडाचा पोत अधिक घट्ट आणि चव अधिक गोडसर होते.
६. सर्व्ह करताना श्रीखंड वाटीत काढल्यावर वरुन चिरलेले बदाम, पिस्ते, काजू आणि गुलाब पाकळ्यांनी सजवा. सुगंधित, गोडसर आणि मलाईदार रोज श्रीखंड चवीला मस्त लागते.



