कांदा हा भारतीय स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा पदार्थ असला, तरी त्याचे गुणधर्म केवळ चवीपुरते मर्यादित नाहीत. उग्र वास आणि डोळ्यात पाणी आणणारा हा कांदा शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी ठरतो. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कांदा खाल्ल्यास तो शरीराला ताकद देण्याचं काम करतो. कांद्याचे गुणधर्म पाहीले तर तो उष्ण प्रकृतीचा मानला जातो. त्यामुळे शरीरातील कफ कमी करण्यास तो मदत करतो. कांद्यामध्ये नैसर्गिक जंतुनाशक आणि दाहशामक गुण असतात. त्यात अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीरातील हानिकारक घटकांशी लढतात. कांदा रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. तसेच कांद्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ आणि काही प्रमाणात लोह व पोटॅशियमही असतं.
कांद्याचे फायदे अनेक आहेत. नियमित आणि मर्यादित प्रमाणात कांदा खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते. भूक नीट लागते आणि अन्न पचायला मदत होते. कांदा शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायद्याचा ठरतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये कांदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करु शकतो. कांद्यामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सर्दी, खोकला आणि घसा दुखणे या त्रासांवरही उपयोगी ठरतात. काही लोकांमध्ये कांदा ताकद वाढवणारा आणि थकवा कमी करणारा पदार्थ म्हणूनही ओळखला जातो.
कांद्याचे अनेक उपयोग आहेत, कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते आणि कोंडा कमी होतो. डास किंवा कीटक चावल्यास कांद्याचा रस त्या ठिकाणी लावल्याने जळजळ आणि खाज कमी होते. कांद्याचा रस त्वचेवरील फोड, पुरळ किंवा जखमेवर हलक्या हाताने लावल्यास जंतुसंसर्ग कमी होण्यास मदत होते.
सर्दीमुळे बंद झालेलं नाक मोकळं करण्यासाठी कांदा घरगुती उपचारांमध्ये वापरला जातो. कांदा कापून जवळ ठेवल्यास त्याचा उग्र वास श्वसनमार्ग मोकळा करण्यास मदत करतो, असा अनुभव अनेक जण सांगतात. काही ठिकाणी कांद्याचा वापर नैसर्गिक कीटकप्रतिबंधक म्हणूनही केला जातो. कांद्याचे तुकडे घरात ठेवल्यास काही प्रमाणात कीटक दूर राहतात. कांद्यामुळे डोळ्यातून पाणी येते. मात्र त्यामुळे डोळे आतून स्वच्छही होतात. त्यामुळे कच्चा कांदा, कमी परतलेला किंवा वाफवलेला आणि शिजवलेला कांदा आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो.
