Sculptor in financial crisis; Situation in Panvel Municipality area | मूर्तिकार आर्थिक संकटात; पनवेल पालिका क्षेत्रातील स्थिती

मूर्तिकार आर्थिक संकटात; पनवेल पालिका क्षेत्रातील स्थिती

कळंबोली : कोरोनामुळे यंदा बनवलेल्या गणेशमूर्तींपैकी ६५ टक्के बाप्पा विकले गेले नाहीत. त्यामुळे कारागिरांना आर्थिक फटका बसला असून, गुंतवलेले पैसेही मिळाले नाहीत. उरलेल्या मूर्तीचे करायचे काय, असा प्रश्न विक्रेत्यासमोर उभा राहिला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात यंदा दहाही दिवस गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला नाही. कोरोनामुळे रोजगारावर झालेला परिणाम, घराबाहेर पडण्याची भीती, मूर्ती स्थापनेवर आलेले शासनाचे बंधने, यामुळे गणेशमूर्ती कमी विकल्या गेल्या. त्याचबरोबर, यंदा घरीच पर्यावरणपूरक, माती, लगदा यापासून बनवलेल्या मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे गणेश मूर्तिकारांकडे बाप्पाची मागणी कमी प्रमाणात झाली.

सार्वजनिक चार फूट तर घरगुती दोन फुटांपर्यंतच्या मूर्ती स्थापना करण्यासाठी शासनाकडून बंधने घालण्यात आली होती. त्यामुुळे बहुतांश भक्तांचा दोन ते दीड फूट उंचीच्या श्रीची स्थापना करण्याकडे कल वाढला. अनेकांनी घरीच मूर्ती बनवल्यामुळे कारागिरांनी बनवलेल्या मूर्ती तशाच राहिल्या आहेत. पनवेलमध्ये भिंगारी, तसेच कुंभार वाडा येथे दहा मूर्ती कारखाने आहेत. परंपरागत व्यवसाय असल्याने, बारा महिने गणेशमूर्ती घडवण्यावरच मूर्तिकारांचा उदरनिर्वाह चालतो, तसेच काही विक्रेते पेण येथून बाप्पांच्या मूर्ती आणतात. पण, ६५ टक्के मूर्ती शिल्लक राहिले आहेत. त्या ठेवण्यास जागेची कमतरता भासत आहे.

गणेशमूर्ती बनवण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. इतक्या वर्षांत यंदा झालेला तोटा कधीच सहन करावा लागला नाही. पनवेल परिसरातील कोरोना काळात काही नागरिक गावी गेल्यानेही विक्रीत घट झाली. त्यामुळे आम्ही बनवलेल्या मूर्ती मोठ्या प्रमाणात उरल्या आहेत. त्यांची विक्री न झाल्यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे.
- केतन मांगरुळकर गणेश मूर्तिकार पनवेल भिंगारी

Web Title: Sculptor in financial crisis; Situation in Panvel Municipality area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.