बाप्पाच्या आगमनाने रायगडकरांच्या उत्साहाला महापूर, बाजार पेठांमध्ये फुल, फळांसह पुजेचे सामान खरेदीची लगबग
By निखिल म्हात्रे | Updated: August 30, 2022 14:47 IST2022-08-30T14:46:56+5:302022-08-30T14:47:12+5:30
अलिबाग - गौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये भक्तांची धावपळ उडाली असून खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा देखील गर्दीने फुलून गेल्या आहेत. ...

बाप्पाच्या आगमनाने रायगडकरांच्या उत्साहाला महापूर, बाजार पेठांमध्ये फुल, फळांसह पुजेचे सामान खरेदीची लगबग
अलिबाग -
गौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये भक्तांची धावपळ उडाली असून खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा देखील गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणपती आरस, पुजेचे सामान याबरोबबरच आरस सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली असून, या सामानाने बाजारपेठ फुलल्या आहेत.
निसर्ग आणि गणेश यांचे निसर्ग वाचवा चे संदेश देणारे माठी सामान बाजारपेठेत मोठया प्रमाणात दाखल झाले आहे. गणेश चतुर्थीसाठी वापरण्यात येणार्या माटी सामानात औषधी गुणधर्म आहेत. या सामानात श्रीफळ, कवंडाळ, काकडी, शेरवाड, तसेच जंगलातील विविधांगी फळे-फुलांचा समावेश आहे. गणेश मूर्ती जेवढी आकर्षक त्याहीपेक्षा सजावट चांगली हवी म्हणून आरास व माटी सामानाकडे भक्तगण अधिक लक्ष देतात असे सांगण्यात आले.
गौरी-गणपती सणासाठी चाकरमानी घर व परीसरातील साफसफाई करण्यासाठी रेल्वे, बस, एस.टी., स्वत:च्या वाहनाने गावात दाखल होत आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा खेळखंडोबा उडाला आहे. या सणावर महागाईचे सावट असले तरी गरीबापासून श्रीमंतापर्यंत गणेश चतुर्थी ऐपतीप्रमाणे आनंदाने साजरी करण्यासाठी धावपळ करत आहे.
गणपती घरगुती असो किंवा सार्वजनिक मंडळाचा हा उत्सव अधिकाधिक प्रकाशित करण्यासाठी भाविक आकर्षक विद्युत रोषणाई करण्यावर भर देतात. त्या दृष्टीने विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. विद्युत रोषणाईच्या बाजारपेठेमध्ये यंदा भारतीय वस्तू नव्याने दाखल झाल्या आहेत. एलईडी, दहा ते शंभर वॉटच्या सिंगल-मल्टिकलर फ्रेड लाइट्स, झालर यासारखे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळत आहे. याबरोबरच रोबलाइट्स, लेझर लाइट्स, पारलाइट्स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र, एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, पळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तीन रंग, सहा रंग ते सोळा रंगाच्या एलईडी स्ट्रीप सेटलाही जास्त मागणी आहे. याच्या किमती 80 रुपयांपासून अगदी पाच-दहा हजार रुपयांपर्यंत आहेत.
स्वदेशी वस्तू महाग असल्या तरी त्या खरेदी केल्या जात असून, चिनी वस्तूंना यंदा मागणी नाही. याबरोबरच यावर्षी थर्माकोळ पासून बनविलेल्या मखरांना बंदी आली असल्याने ग्राहक एलडी लाईट खरेदी करीत आहेत असे इलेक्ट्रिकल्स विक्रेते शैलेश पाटील यांनी सांगितले.
उत्साहाच्या भरात रायगडकर नियम विसरले -
सध्या खरेदीसाठी नागरीक सध्या गर्दी करीत आहेत. यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्सचे कोणतेही पालन होताना दिसत नाही. पोलिस सतत नागरीकांना बाजारपेठेत अवाहन करीत होते. मात्र पोलिसांच्या अलाभंन्समेंन्टकडे नारीकांचा कानाडोला होता.
गणेशोत्सवात येणाऱ्या भक्तांना कोणतीही सक्ती नसली तरी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय करणे, सर्वांसाठीच उपयुक्त असणार आहे, याचा विचार करून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून गणेश मंडळांसाठी सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोररित्या पालन करावे, असेही आवाहन पालकमंत्री अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना केले आहे.