"कोण डोंगर, कोण झाडी, कोण दरी बघतंय"; आदित्य ठाकरेंचा असाही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:20 PM2022-06-26T18:20:07+5:302022-06-26T18:38:31+5:30

विशेष म्हणजे बंडखोर आमदारांवर टिका करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनीही गुवाहटीतील काय झाडी, काय डोंगार, काय हाटीलवर भाष्य केलं.

राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या 5 दिवसांपासून सातत्याने राजकीय घडामोडींतून भूकंपाचे धक्के बसत आहेत. या घटनांकडे लोकं जेवढं गांभीर्याने पाहात आहेत, तितकीच मजाही घेत आहेत.

शिवसेनेचे सांगोल्यातील आमदार शहाजी पाटील यांचा एका कार्यकर्त्याशी झालेला फोनसंवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या कॉलमध्ये शहाजी पाटील यांनी शिंदेंसोबत जाण्याची आपली मजबुरी आणि भविष्यातील फडणवीस सरकारचे भाकितही केलं आहे.

त्यात, उद्धव ठाकरेंना देवमाणूस म्हणतानाच त्यांच्याकडून काम होत नव्हती असेही ते म्हणाले. यावेळी, राष्ट्रवादीवर गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत. या कॉलमधील सुरुवातीचा एक डायलॉग तुफान व्हायरल झाला आहे.

या डॉयलॉगवरुन सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले आहेत. तर अनेकांनी डोंगरदऱ्यातील फोटो शेअर करत, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असं कॅप्शनही दिलं आहे.

विशेष म्हणजे बंडखोर आमदारांवर टिका करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनीही गुवाहटीतील काय झाडी, काय डोंगार, काय हाटीलवर भाष्य केलं.

आदित्य ठाकरेंनी शिवसेना मेळाव्यात गुवाहटीतील आमदारांवर तोफ डागली. बंडखोरांनी विचार करावा, पक्का विचार करावा. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली त्यांचं काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे.

कृषीमंत्री, सध्या पेरणी चालू होतेय की नाही, पाऊस येतोय की नाही, हे सगळं असताना कृषीमंत्री कुठे आहेत. जिथं पूर आला तिथे गेलेत. कोण डोंगर बघंतय, कोण दरी बघतंय, कोण झाडं बघतंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला.

शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहटीतील हॉटेल रॅडीसन ब्लू येथे वास्तव्यास असून त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे

राज्यातील या राजकीय घडामोडींवरुन सोशल मीडियात मिम्स तयार होत आहेत, तर राज्याच्या सत्ताबदलावरुन अनेकांनी हा विषय गंभीर असल्याचं म्हटलं आहे.