Shweta Mahale: 'या' आमदार देशात 'सर्वोत्कृष्ट, चंद्रकांत पाटील म्हणाले सार्थ अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 09:14 PM2022-03-16T21:14:02+5:302022-03-16T21:36:20+5:30

'सर्वोत्कृष्ट आमदार 2022' हा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते राजधानी दिल्ली येथे स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.

सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट आमदार हा पुरस्कार यंदा चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना मिळाला आहे.

'सर्वोत्कृष्ट आमदार 2022' हा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते राजधानी दिल्ली येथे स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.

सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार असून आज 16 मार्च रोजी भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन_रावत यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला.

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मी विनम्रतेने माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने या सन्मानाचा स्वीकार केला, असे आमदार महाले यांनी म्हटले.

अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण, सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने माझ्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला होता.

सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्डस अँड लीडरशिप समिट 2022 चे आयोजक अध्यक्ष डॉ. प्रदीप भारद्वाज यांनी पुरस्काराविषयी पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, "समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद आहे."

"हा नागरिकांचा सन्मान" हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा असून हा पुरस्कार मी जनतेलाच अर्पण करते, असेही श्वेता महाले यांनी म्हटले.

दरम्यान, या अवॉर्डनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं असून भाजपच्या महिला नारी शक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटलंय.